शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या संदर्भातला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा आजचा युक्तिवादही संपला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितलं असून पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे तो उद्धव ठाकरेंच्या पक्ष प्रमुख पदाचा.
काय होणार उद्धव ठाकरेंच्या पक्ष प्रमुख पदाचं?
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपते आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २३ जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
काय आहे नेमका पेच?
१७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका यामागे पक्षाने मांडली होती. ती मान्यही झाली. २०१३ मध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली. २३ जानेवारी २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली. नेमकं या गोष्टीवर शिंदे गटाने बोट ठेवलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंनी तयार केलं आहे ते घटनाबाह्य आहे असा दावा मागच्या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आता २३ जानेवारीनंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यावर काय झालं?
मागच्या वर्षी जून महिन्या शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतला एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पदालाच आव्हान दिलं आहे. तसंच आम्हीचा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे घेऊन चाललो आहोत असं म्हणत पक्षावरही दावा सांगितला आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला हे सांगितलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरेंनी निर्माण केलं आणि ते घटनाबाह्य आहे. २०१८ मध्ये याबाबत कुणालाही कसलीच कल्पना देता हा बदल झाल्याचंही शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी म्हटलं आहे. तर शिंदे गटाचे हे सगळे दावे हास्यास्पद असल्याचा दावा करत अनिल देसाई यांनी हे दावे फेटाळले आहेत. हे सगळं जरी असलं तरीही शिवसेना पक्षप्रमुख या पदाची मुदत २३ जानेवारीला संपते आहे. त्यामुळे पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.