अवकळा..
कडवंची.. जालना तालुक्यातील उपक्रमशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. जवळपास २०० हेक्टर द्राक्षे आणि ४० हेक्टर डाळिंबाच्या बागा असलेले. पाणी बचतीसाठीही गावचा मोठा लौकिक. गेल्या दुष्काळात सगळीकडे पाण्यासाठी वणवण झाली. मात्र, कडवंचीला हा फटका जाणवला नाही. पाणी जपून वापरणाऱ्या या गावात पाणी साठवणुकीचे वेगवेगळे प्रयोग करणारे जालना कृषी विज्ञान केंद्रातील अभियंता पंडित वासरे सांगत होते. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे गावातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. काही द्राक्षांची प्रत घसरली. चारपाच कोटींचा फटका या एकाच गावात बसला. डाळिंब पिकाचे नुकसान ५० लाखांच्या घरात आहे. कडवंची परिसरात गारा पडण्याचे प्रमाण फार मोठे नव्हते. परंतु जोरदार वादळी पावसामुळे ही हानी झाली. ८० टक्के पिकांचे नुकसान झाले.
बाजेखाली झाकले, म्हणून मुलं वाचली..
काही दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील अन्वी येथील अच्युत टाकणे आपली व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. घरावरचे पत्रे उडाली. गारपीट व पावसापासून लहान मुलांना कसेबसे बाजेखाली झाकून संरक्षण दिले, असे ते सांगत होते. जाफराबाद तालुक्यातील डहाकेवाडी येथे घरे आणि गोठय़ांवरील पत्रे उडाली. गुलाबराव जंजाळ यांच्या पोल्ट्री फार्मवरील ४० कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या. जिल्ह्य़ात २८ जनावरे मृत्युमुखी पडली. दोन व्यक्तींचा बळी गेला.
मोसंबीची बाग कुठे गेली?..
जिल्ह्य़ातील अनेक गावांची व्यथाही अशीच आहे. साडेपाचशेपेक्षा अधिक गावांना वादळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याचा शासकीय आकडा. अंबडच्या प्रल्हाद राजपूत यांच्याकडे एक हजार मोसंबीची झाडे आहेत. गारपिटीने ती हातातून गेली. दोन एकरवरील गहूपीक उद्ध्वस्त झाले. बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील पंढरीनाथ मुरकुटे यांचा शेडनेटमधील सिमला मिरचीचा प्लॉट जमीनदोस्त झाला. जिल्ह्य़ात शेडनेटमधील १६८ असे प्लॉट गारपीट व वादळी पावसाच्या तावडीत सापडले.
छप्परच उडाले..
जालना, अंबड व घनसावंगी हे तीन तालुके फळपिकांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्य़ात ९ हजार २०२ हेक्टरवरील फळपिकांची हानी झाली. गेल्या वर्षीच्या दुष्काळात पाणी नसल्याने फळबागा जळून गेल्या. ज्या फळबागा वाचल्या, त्या आता गारपीट व वादळी पावसाने उद्ध्वस्त झाल्या.. घरे व शाळांवरील पत्रे उडण्याचे प्रमाणही मोठे आहे. वीटभट्टय़ांचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले.
ज्वारी गेली, फळे सडली..
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील संजय जोशी यांचे तीन एकर मका व तीन एकर गव्हाचे नुकसान झाले. अंबड, घनसावंगी तालुक्यांत गोदावरी नदीपात्रातील टरबूज, खरबूज व काकडी पिकांची हानी झाली. घनसावंगी तालुक्यातील गुंज, शहागड परिसरातील या पिकांना लागलेली फळे गारपिटीने फुटली आणि सडली. अंबड तालुक्यातील ताडहदगाव येथील राजाराम मिसाळ यांनी शेतात काढून ठेवलेली ज्वारी वादळी पावसात भिजून गेली. पावसामुळे कापसाचे नुकसान झाले.
‘पुढे काय?’
अवकळा..कडवंची.. जालना तालुक्यातील उपक्रमशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. जवळपास २०० हेक्टर द्राक्षे आणि ४० हेक्टर डाळिंबाच्या बागा असलेले. पाणी बचतीसाठीही गावचा मोठा लौकिक. गेल्या दुष्काळात सगळीकडे पाण्यासाठी वणवण झाली. मात्र, कडवंचीला हा फटका जाणवला नाही. पाणी जपून वापरणाऱ्या या गावात …
First published on: 17-03-2014 at 02:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whate next