मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण धरलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू असून आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सलाईन लावली असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मराठा समाजाकरता मनोज जरांगे पाटलांनी आता त्यांच्या जिवाचीही पर्वा केली नाहीय. या सर्व परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. पप्पा तर जिद्दी आहेत, आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणारच नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांची कन्या पल्लवी जरांगे पाटील हिने आज टीव्ही ९ मराठीला दिली.
हेही वाचा >> “पप्पांनी नऊ दिवस काहीच खाल्लं नाही, त्यांची…”, जरांगे पाटलांच्या मुलाचे डोळे पाणावले, म्हणाला, “या सरकारला…”
मनोज जरांगे पाटलांना तीन मुली आहेत. सर्वांत लहान मुलगी पल्लवी हिला मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे. पल्लवी जरांगे पाटील म्हणाली की, “मी इयत्ता आठवीत शिकत असून, मोठं होऊन मला आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे.” तिची आयपीएस ऑफिसर होण्याची इच्छा ऐकताच “पोलिसांनी तर तुझ्या बाबांच्या आंदोलनावर लाठीमार केला”, असा प्रश्न तिला विचारला गेला. त्यावर ती म्हणाली की, “यात पोलिसांचा काय दोष? पोलिसांना वरून ऑर्डर आली, ती त्यांनी पाळली. ते काहीही करोत, पण आयपीएस होण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा आहे.” यावर तिला प्रतिप्रश्न विचारला गेला की, “भविष्यात तू आयपीएस ऑफिसर झालीस आणि आंदोलनावर लाठीमार करण्याची ऑर्डर तुला आली तर तू काय करणार?” त्यावर ती म्हणाली की, “तेव्हाच पाहीन. ते आताच काही सांगू शकत नाही.” “थोडक्यात ऑर्डर पाळावी लागेल”, असं पत्रकारांने म्हणताच तिने त्यांना होकारार्थी मान हलवली.
हेही वाचा >> “…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…”
“पप्पा तर जिद्दी आहेत. ते ऐकणारच नाहीत. आता तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याला संपूर्णपणे सरकार जबाबदार राहणार. पण मी पप्पांनी सांगेन की त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी”, असंही पल्लवी जरांगे पाटील म्हणाली.
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, जालना येथे शुक्रवारी (१ सप्टेंबर) मराठा आंदलोकांवर लाठीजार्च करण्यात आला होता. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. एवढंच नव्हे तर खुद्द गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या लाठीमारप्रकरणी माफीही मागितली. संबंधित पोलीस अधिक्षकांचं निलंबन करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच जालन्यातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतल्याची घोषणाही त्यांनी केली.
मुलाने काय म्हटलंय?
शिवराज मनोज जरांगे-पाटील म्हणाला, “मला आता पप्पांची काळजी वाटतेय. गेल्या नऊ दिवसांत पप्पांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळेच त्यांची काळजी वाटू लागली आहे. मी पप्पांना सांगेन आपल्याला आरक्षण हवं आहे, पण तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. आपला संपूर्ण समाज अनेक दिवसांपासून लढतोय. समाजाला न्याय मिळायला हवा. यासाठी आपण लढत राहू आणि न्याय मिळवू.” वडिलांच्या प्रकृतीबद्दल बोलत असताना शिवराजचे डोळे पाणावले होते.
पत्नीने काय प्रतिक्रिया दिली?
मनोज जरांगे मागील नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रकृती काळजी वाटतेय का? असं विचारलं असता जरांगे पाटलांच्या पत्नी म्हणाल्या, “मलाही आता त्यांची थोडीशी काळजी वाटत आहे. सरकारनेही त्यांची काळजी घ्यावी. आज बारा वाजेपर्यंत सरकारने जो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय घ्यावा. काल त्यांनी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. परंतु त्यांनी आणखी वेळ वाढवून मागितला. पण आज बारा वाजेपर्यंत सरकारने काय असेल तो निर्णय द्यावा, तरच ते उपोषण सोडायला तयार होतील.”