१६ आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या (१० जानेवारी) दुपारनंतर या प्रकरणाचा राखून ठेवलेल्या निकालाचं वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याचा निकालाचा कौल ठाकरे गटाच्या की शिंदे गटाच्या बाजूने लागतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान प्रकरणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
भरत गोगावले म्हणाले, उद्या राखून ठेवलेल्या निकालाचं वाचन होईल. प्रत्येक पक्षकाराला वाटतं की आपल्याबाजूने निकाल लागावा. तसं आम्हालाही वाटतं. सुनावणीवेळी आमच्या उलट तपासण्या झाल्या आहेत. त्यावेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्यप्रकारे दिली. पण तुम्ही सुनील प्रभूंना विचारा, त्यांनी दिलेली उत्तरे आणि आम्ही दिलेली उत्तरे यात तफावत आहेत. मेरिटमध्ये आम्ही आहोतच.
हेही वाचा >> मुख्यमंत्री शिंदे अन् अध्यक्ष नार्वेकर भेटीवर उल्हास बापटांची टीका; म्हणाले, “हे म्हणजे…”
ते पुढे म्हणाले, १५-१६ लोक टिकून राहावेत म्हणून ठाकरे गटाने केलेला हा अट्टाहास आहे. त्यांच्यात हिंमत असती तर ते अविश्वास प्रस्तावाला सामोरे गेले असते. पण त्यांनी आधीच राजीनामा दिला. याचा अर्थ त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. आम्हाला खात्री आहे की उद्याचा निर्णय आमच्याच बाजूने लागेल.
प्रतोदपदी नियुक्ती वैधच
भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे, असं अनिल परब म्हणाले. त्यावर भरत गोगावले म्हणाले, एकनाथ शिंदे गटनेते होते. गटनेत्यांनीच नियुक्ती केली आहे. नियुक्तीनुसार आमचं कामकाज चालू होतं. अनिल परबांना एवढा आत्मविश्वास असेल तर ते का घाबरत आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की जे होईल ते चांगलं आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी भेट
न्यायमूर्ती (राहुल नार्वेकर) दोनवेळा मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्यामुळे न्याय मिळणार नाही अशी भीती वाटत आहे, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर भरत गोगावले म्हणाले, न्याय मिळणार नसेल तर त्याचं त्यांनी ठरवावं. ज्यावेळेला काही घटना घडतात तेव्हा असं एकमेकांसोबत मिळावं लागतं. महाराष्ट्राच्या मुद्द्यावर, मराठा आरक्षणासाठी ते एकमेकांना भेटले होते. त्यांचं (उद्धव ठाकरे) मनच त्यांना टोचत असेल तर त्याला आपण काय औषध देणार? त्यामुळे उद्याचा निकालच त्यांच्यासाठी औषध राहिल. परंतु, अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकमेकांना भेटलं यात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. इतर कामांसाठीही ते भेटले असतील, असंही भरत गोगावले म्हणाले.