Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला न्यायालयात त्यामुळेच प्रलंबित राहिला आहे का? असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच विरोधकांनी न्यायपालिका आणि कार्यपालिकेमध्ये अंतर असायला हवे, अशी भावना व्यक्त केली. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्णन आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा इफ्तार पार्टीतील फोटो पोस्ट केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, “गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?”

हे वाचा >> Video: “क्रोनोलॉजी समजून घ्या..”, पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीश चंद्रचूड गणपती दर्शनावर संजय राऊतांची खोचक टीका

“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच १८ सप्टेंबर २००९ साली माजी सरन्यायाधीश केजी बाळकृष्णन यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी आयोजित इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याचे फोटोही पोस्टसह अपलोड केले आहेत.

शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांचीही टीका

शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही संजय राऊत यांच्या भूमिकेवर टीका केली. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रेयत ते म्हणाले, गणेश चतुर्थीनिमित्त राजकीय विरोधकही एकमेकांच्या घरी दर्शन घेण्यासाठी जात असतात. मी २० वर्षांपासून हे करत आलो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरन्यायाधीश यांच्या घरी जाण्यावरून जी टीका होतेय, त्याचा स्तर खालावलेला आहे.

यानंतर मिलिंद देवरा यांनीही २००९ साली माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्ण यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचा मुद्दा उपस्थित केला. देवरा म्हणाले की, आता २००९ च्या घटनेवरही तुम्ही टीका करणार का? विरोधक खूपच अपरिपक्व अशी टीका करत आहेत. आरोप करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेतली पाहीजे.