आषाढी एकादशी यंदा कधी साजरी करायची..८ जुलै की ९ जुलैला? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे विविध पंचांगांमधील तफावत. महाराष्ट्रातील पंचांगांनुसार आषाढी एकादशी ९ जुलै रोजी आहे, तर देशातील इतर पंचांगांनी ती ८ जुलै रोजी येत असल्याचे दाखवले आहे. पंचांगांमधील ही तफावत ती वापरत असलेल्या वेगवेगळ्या आधारांमुळे आली असून, दोन्ही बाजू आपापल्या आधारावर ठाम आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश प्रमुख पंचांगे दृकसिद्धांतावर आधारित आहेत. ती ‘ग्रीनवीच मीन टाईम’ (जीएमटी) म्हणजेच आताची ‘युनिव्हर्सल टाईम कॉर्डिनेटेड’ (यूटीसी) या वेळेचा आधार घेतात. त्यात भारतीय प्रमाण वेळेचा फरक गृहीत धरून त्या आधारावर ही पंचांगे तयार केली जातात. मात्र, देशाच्या इतर भागात वापरली जाणारी पंचांगे सूर्यसिद्धांत हा आधार मानतात. त्यात भारताच्या मधोमध मानल्या जाणाऱ्या उज्जन या केंद्रावरून जाणारी रेषा आधारभूत मानून पंचांगे तयार केली जातात. पंचांग बनवण्याची ही पद्धत प्राचीन काळापासून रूढ आहे. आर्यभट्ट, लल्लाचार्य, भास्कराचार्य अशा प्राचीन अभ्यासकांनी याच रेषेचा आधार घेऊन गणिते मांडल्याचे सांगितले जाते. या रेषेचा आधार घेऊन तयार केलेल्या पंचांगांमध्ये काशी येथील दमनमोहन मालवीय पुरस्कृत विश्व पंचांग, गणेश आपा पंचांग, हृषीकेश पंचांग, अन्नपूर्णा पंचांग, मध्वाचार्य पंचांग, शृंगेरी शंकराचार्याच्या पीठाचे पंचांग, धारवाड पंचांग अशा अनेक पंचांगांचा समावेश होतो. या दोन्ही पंचांगांचा आधारच वेगळा असल्याने त्यांच्या तिथींमध्येही थोडा फार फरक असतो. काही वेळा हा फरक साडेचार ते पाच तासांपर्यंतही वाढतो. अशा वेळी या दोन पंचांगांमध्ये एकच तिथी वेगवेगळ्या दिवशी येऊ शकते. या आषाढी एकादशीला हे घडणार आहे.
यंदा सूर्यसिद्धांतानुसार आषाढी एकादशी ८ जुलै रोजी रात्री ११.५७ वाजता संपते. त्यामुळे या पंचांगानुसार एकादशी ८ जुलै रोजी पाळणे आवश्यक आहे. मात्र, दृकसिद्धांतानुसार एकादशी संपण्याची वेळ ९ जुलैला पहाटे ४.४० मिनिटांनी येते. त्यामुळे त्या सिद्धांतानुसार एकादशी ९ जुलै रोजी येते. त्यामुळे हा फरक आला आहे.
– गौरव देशपांडे, पंचांगकर्ते