राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एक वक्तव्य त्यांनी केलं. त्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. ‘माझं नाव राहुल सावरकर नाही माझं नाव राहुल गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत.’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ज्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटू लागले आहेत. रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मणिशंकर अय्यर यांनी वीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी २००४ मध्ये झालेल्या आंदोलनात मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. तशाच प्रकारचं आंदोलन उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या विरोधात करणार का? असं एकनाथ शिंदे यांनी विचारलं आहे. चर्चा सुरू झाली आहे ती त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेची. आपण जाणून घेणार आहोत २००४ मध्ये नेमकं काय घडलं होतं?
२००४ मध्ये नेमकं काय घडलं होतं?
२००४ मध्ये भारतात युपीएची सत्ता होती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मणिशंकर अय्यर हे अंदमान भेटीवर गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे असलेल्या एका ज्योतीशेजारी असलेल्या फलकावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव पाहिलं. ज्यामुळे ते चिडले आणि तातडीने तो फलक तिथून हटवण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर वीर सावरकर यांच्याविषयी त्यांनी अपशब्दही वापरले. या घटनेनंतर अंदमान निकोबारमध्ये क्षोभ उसळला. त्यावेळी तिथे असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले.
महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?
मणिशंकर अय्यर यांनी वीर सावरकर यांचं नाव ज्योती शेजारच्या फलकावरून हटवल्यानंतर आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संतापले. तसंच शिवसेनेने महाराष्ट्रभरात आंदोलन केलं. शिवाजी पार्क मैदानात मणिशंकर अय्यर यांचा पुतळा ठेवण्यात आला त्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. या आंदोलनाची सुरूवात बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा मारला तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यानंतर महाराष्ट्रात हे आंदोलन तीव्र झालं होतं. ठिकठिकाणी मणिशंकर अय्यर यांचा पुतळा जाळण्यात आला किंवा त्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. ‘वीर सावरकर हे आमचं दैवत आहेत आणि आम्ही त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही’ अशी रोखठोक आणि आक्रमक भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी घेतली होती.
कोण आहे मणिशंकर अय्यर?
त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी एक भाषणही केलं होतं. आपल्या भाषणातही बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली होती. “कोण आहे हा मणिशंकर अय्यर? आणि त्याला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी काय माहिती आहे? ” असा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी विचारला होता. तसंच वीर सावरकर यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही असंही ठणकावलं होतं. हा वाद पुढे इतका वाढला होता की त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना समोर येऊन आम्ही वीर सावरकर यांच्या विरोधात नाही हे सांगावं लागलं होतं.
२००४ चं हे आंदोलन अजूनही लोकांच्या स्मरणात
२००४ मध्ये झालेली ही घटना अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आक्रमक भूमिकाही लोकांना ठाऊक आहे. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मालेगावच्या सभेत राहुल गांधी यांना इशारा दिला तेव्हा त्यांच्यावर भाजपाने टीका केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टीका केली. २००४ मध्ये घडलेल्या या घटनेला १९ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र वीर सावरकरांचा झालेला अपमान हा पुन्हा चर्चेत आला असल्याने आणि शिवसेनेत भली मोठी फूट पडली असल्याने एकनाथ शिंदे हे सातत्याने मणिशंकर अय्यर यांच्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनाची आठवण ही उद्धव ठाकरेंना करून देत आहेत. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या पुतळ्याला असेच जोडे मारणार का? असाही प्रश्न विचारत आहेत. मात्र या बाबत ठाकरे गटाकडून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. राहुल गांधी यांनी जो वीर सावरकर यांचा अपमान केला त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.