शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे कायमच चर्चेत राहिले आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असतानाही ते चर्चेत होते. तसंच आपल्या विविध प्रतिक्रिया आणि ट्विट्समुळेही ते चर्चेत असतात. सध्या त्यांची चर्चा पुन्हा एकदा होते आहे कारण त्यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. आपल्या हुरडा खायचा मोह कसा आवरला नाही ते या फोटोंमधून रोहित पवार सांगत आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत.
काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?
थंडी आणि हुरडा हे एक समीकरणच आहे. आज दौरा संपवून परतीच्या वाटेवर असताना एक भगिनी हुरडा विकताना दिसली. ते पाहून हुरडा खाण्याचा मोह आवरला नाही. असं कॅप्शन देत रोहित पवार यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये आमदार रोहित पवार हे हुरडा विकणाऱ्या ताईकडून हुरडा विकत घेऊन तो खाताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी हे ट्विट केलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार आणि सदाभाऊ खोत यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. भाजपाचे नेते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती आणि विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केलं होतं. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. त्यांच्याच सरकारच्या काळातच असे निर्णय घेतले गेले की विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या असं म्हणत त्यांना उत्तर दिलं होतं.
राजकारणातले हे आरोप प्रत्यारोप तर सुरुच असतात. पण रोहित पवार हे त्यांच्या विविध ट्विट्ससाठी प्रसिद्ध आहेत. आज त्यांनी हुरडा खाण्याचा मोह कसा आवरला नाही हे ट्विट करून सांगितलं आहे. तसंच रस्त्यावर हुरडा विकणाऱ्या ताईकडून हुरडा विकत घेतल्याचंही सांगितलं आहे. त्यांचे हे फोटो आणि ट्विट चर्चेत आहेत.