राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. शरद पवार ज्या गोष्टीला हात लावतात, त्याची राख होते, अशी टीका पडळकरांनी केली आहे. शरद पवारांनी हात लावल्यानेच शिवसेनेची राख झाली, असंही पडळकर म्हणाले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शिवसेना फुटली असं तुम्हाला वाटतं का? असं विचारलं असता गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी पडळकर म्हणाले, “हे पाहा मी एक गोष्ट ऐकली होती. आटपाट नगरात एक राजा होता. त्याने कोणत्याही गोष्टीला स्पर्श केला तर त्याचं सोनं होत होतं, असं आम्ही ऐकलं होतं, तुम्हीही सगळ्यांनी ऐकलं असेल. पण बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात एखाद्या गोष्टीला लागला तर त्याची राख होते. हे आपण शिवसेनेच्या बाबतीत प्रत्यक्ष बघितलं आहे.”

हेही वाचा- “…तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित करून ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे”, गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

“त्यामुळे जो-जो राष्ट्रवादीच्या नादाला लागला त्याची राख होतेय. आता शिवसेनेचीही झाली आहे, हे मी स्वत: म्हणत नाही. हे शरद पवारांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. भाजपा आणि शिवसेना पक्षांत अंतर यायला हवं, म्हणून मी बरेच प्रयत्न केलेत, असं शरद पवार स्वत: म्हणाले आहे. हे पवारांचं वाक्य आहे. त्यांना शिवसेनेला कसल्याही पद्धतीत संपवायचं होतं. त्यांचं काम आता पूर्ण झालं आहे” अशी टीका पडळकरांनी केली आहे.

हेही वाचा- “…तर कानाखाली आवाज काढेन”, संतोष बांगरांचा कृषी कार्यालयात पुन्हा राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवीगाळ

दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्र सोडलं आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. आमच्याबरोबर दुजाभाव होत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून पडळकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

“उद्धव ठाकरेंबरोबर कसला दुजाभाव केला आहे? खरं तर, निवडणूक आयोगाकडे आम्हीच विनंती करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचं विलीनीकरण करून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांमध्ये सहजपणे जाता येईल. कारण ‘मशाल’ चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. ‘खंजीर’ म्हटलं तर लोकांच्या लगेच लक्षात आलं असतं, अशी टीका पडळकरांनी केली आहे.