अलिबाग : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविजय २०२४ संकल्प यात्रेला सुरूवात केली आहे. यात्रेच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग मधील नागरीकांशी संवाद साधला. यावेळी बाजारपेठेतील एका दुकानदाराच्या उत्तराने बावनकुळे यांची चांगलीच पंचाईत झाली.
हेही वाचा >>> धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला : गोपीचंद पडळकर
महा विजय संकल्प यात्रे निमित्ताने बावनकुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. साधारणपणे पतंप्रधानपदी तुम्हाला कोण हवे हा त्यांच्या संवादाचा सूर आहे. यात्रेच्या निमित्ताने भाजपकडून जोरदार तयारी आणि वातावरण निर्मितीही केली जात आहे. अशाच पध्दतीने डीजे ढोल ताश्यांच्या गजरात भाजपची महाविजय संकल्प यात्रा २०२४ बुधवारी अलिबागमध्ये दाखल झाली होती.
पक्षाच्या वतीने यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शहरभरात झेंडे, पताका, बॅनर्स लाऊन वातावरण यात्रेची निर्मिती करण्यात आली होती. दुपारी साडे बाराच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि आमदार अलिबाग शहरात दाखल झाले. काळंबा देवी आणि अलिशाह बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन बावनकुळे यांनी जनसंवाद यात्रेला सुरवात केली. बाजारपेठ परीसरात जाऊन दुकानदार आणि ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान पदी तम्हाला कोण पहायला आवडेल हा एकच प्रश्न ते सर्वांना विचारत होते. स्वाभाविकपणे भाजपची यात्रा असल्याने बहुतांश लोक नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन बाजूला होत होते
हेही वाचा >>> आता गवताळ प्रदेशातही पर्यटन होणार; राज्यातील ‘हा’ पहिलाच प्रयोग पुणे, सोलापूर जिल्ह्यात
मात्र बाजार पेठेतील एका दुकानदाराला बावनकुळे यांनी पुन्हा पंतप्रधानपदी कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने, राहूल गांधी असे स्पष्ट उत्तर दिले. या उत्तरामुळे बावनकुळे यांची चांगलीच पंचाईल झाली. आणि त्यांनी साडेचारशेपैकी एका व्यक्तीने राहूल गांधी यांचे नाव घेतले असे काही हरकत नाही म्हणत वेळ मारून नेली.