हमी भावापेक्षा कमी दराने बाजारात तूर विक्री

या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरुवात झाली आहे.  अनेक शेतकऱ्यांच्या घरी तूर आली आहे.  मात्र, अद्यापही शासनाने नाफेडअंतर्गत तुरीची ऑनलाइन नोंदणीही सुरू केलेली नाही. परिणामी, आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात तूर विकावी लागत आहे.  नवीन तूर खरेदी प्रति क्विंटल ४ हजार ४०० रुपयांनी सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांना तूर खरेदी केंद्र सुरू होण्याची अपेक्षा आहे.

यंदा सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल निघाल्याबरोबर विकण्याशिवाय पर्यायच नाही. याच संधीचा फायदा सध्या खासगी व्यापारी घेत आहेत. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रुपये तोटा सहन करून तूर विकावी लागत आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मागील हंगामात ऑनलाइन नोंदणी केलेल्या काही शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नव्हती. अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अग्रीम बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु, वर्ष लोटू नही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमाच झाले नाहीत.

शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, त्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट होऊ  नये, यासाठी शासनाने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. यंदा तुरीचा हमीभाव ५ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटल आहे. यंदा अल्प पाण्याअभावी व मध्यंतरी धुके पडल्याने तुरीचे पीक करपले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ऑनलाइन तूर नोंदणीस सुरुवात झाली होती. यंदा शासनाने तूर खरेदीचे आदेशच दिले नाहीत. परिणामी, शेतकरी कोंडीत सापडला आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, कापसानंतर तुरीचे प्रमुख उत्पादन घेतले जाते. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे कोरडवाहू पट्टय़ातील तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी तुरीचे दमदार उत्पादन झाले होते. तुरीची शासकीय खरेदीही सुरू केली होती, परंतु शासनाने मोजकीच तूर खरेदी केल्याने बहुतांश शेतकऱ्यांना तूर बाजारात मातीमोल भावाने विकावी लागली.

नोंदणी करूनही तूर खरेदी न झाल्याने शासनाने संबंधित शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचे मधाचे बोट पुसण्याची घोषणा केली, परंतु त्यालाही कमालीच्या मर्यादा असल्यामुळे सरासरी पाच हजार रुपयांच्या वर शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान मिळत नसल्याचे वास्तव आहे.

शासनाने वाढीव हमीभाव घोषित केल्याने शेतकऱ्य़ांच्या आशा पल्लवित झाल्या खऱ्या, परंतु शासकीय खरेदीच्या अद्याप कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्यामुळे यावर्षीही तुर उत्पादकांना जबर झटका सोसावा लागणार आहे.

केंद्र शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव घोषित केला आहे. गेल्यावर्षी खुल्या बाजारात तुरीचे दर किमान ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत घसरले होते. नोंदणी करूनही खरेदी न झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Story img Loader