शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरा करत पक्षाची पुनर्बांधणी केली. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? हा प्रश्नही अनेकदा चर्चेत येत आहे. याच प्रश्नावर आता आदित्य ठाकरेंनी खळखळून हसत पण राजकीय पठडीतील उत्तरं दिली आहेत.
आदित्य ठाकरे यांनी नुकतंच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी विविध राजकीय प्रश्नांवर सडेतोड उत्तरं दिली. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ निवासस्थानी येऊन रडल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? याबाबतचा प्रसंगही आदित्य ठाकरेंनी सांगितला. या मुलाखतीच्या शेवटी आदित्य ठाकरेंना लग्नासंबंधित प्रश्न विचारण्यात आले, यावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. पण राजकारणातील मुलीशी लग्न करायचं नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न विचारला असता खळखळून हसत आदित्य ठाकरे म्हणाले, “जाऊ द्या, हा प्रश्न पास करतो. घरी प्रेशर वाढत चाललं की लवकरात लवकर लग्न करू, असं माझं उत्तर असतं.”
हेही वाचा- राज ठाकरेंची आवडती अभिनेत्री कोण? थेट नाव घेत म्हणाले, “आतापर्यंत एकच अभिनेत्री…”
लग्नासाठी मुलगी कशी हवी आहे? ते तरी सांगा… असं म्हटल्यावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं. पण “लग्नासाठी राजकारणातील मुलगी बिलकूल नको” असं ते म्हणाले. शिवाय “मला लग्नासाठी मुलगी कशी हवी आहे? यावर कुणीतरी जनहित याचिका दाखल केली पाहिजे, असं मला वाटतं” असं राजकीय पठडीतील उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं. आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.