महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा केला आहे. तसंच भाजपाला संघालाही त्यांनी खडे बोल सुनावले आहे. मी जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो तर माझ्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका केली जाते. सरसंघचालक मोहन भागवत हे जेव्हा मशिदीत जातात तेव्हा ते काय सोडतात? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

“उद्धव ठाकरे जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला तर मी हिंदुत्व सोडलं, मग मोहन भागवत जेव्हा मशिदीत जातात तेव्हा ते काय सोडतात? मी उद्या मशिदीत गेलो तर किती बोंबाबोंब करतील? पण सरसंघचालक जे बोलतात ते हिंदुत्व. अरे आधी तुमच्या हिंदुत्वाचा शेंडा, बुडखा, आकार काहीतरी ठरवा. आधी तो समजून घ्या आणि मग बोंबाबोंब करा. पण आता आपल्याला यातून सगळ्यांना शहाणं व्हायचं आहे. आज या सभेत काँग्रेसचा झेंडा आहे, राष्ट्रवादीचा झेंडा आणि आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा आहे. वज्रमुठीत आपल्याला भगवा झेंडा मजबुतीने धरायचा आहे आणि या भगव्याला जो डाग लावण्याचा प्रयत्न यांनी केला आहे तो आपल्याला साफ करुन छत्रपती शिवरायांचा भगवा आपल्याला उंच फडकवत ठेवायचा आहे.” असंही आवाहन या सभेत उद्धव ठाकरेंनी केलं.

आज तर नुसती सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचं वस्रहरण थांबवायचं असेल तर आपल्या वज्रमुठीचा ठोसा असा मारा की महापालिका निवडणूक असो की विधानसभा निवडणूक किंवा लोकसभा येऊ द्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही आणि अमित शाह यांना सांगतो की जमीन दाखवणं काय असतं ते तुम्हाला माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

Story img Loader