मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन उद्या साजरा केला जाणार आहे. यानिमित्त संभाजी नगर येथे मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊतही मराठवाड्यात दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत मराठवाड्याला मिळालेल्या सापत्न वागणुकीवरून त्यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. मराठवाड्यासाठी जाहीर केलेला विकासनिधी कुठे गेला असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.
“संभाजी नगरचे सर्व हॉटेल्स बंद आहेत. कोणासाठी, कोण येतंय इथं? किती मंत्री आणि अधिकारी येणार आहेत. जत्रा कोणाची येतेय इथं? जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्स बुक केल्याचं मला कळलं. कोण करतंय खर्च, बेकायदेशीर सरकारकडून खर्च होतोय. या गोष्टींचा विचार करायला लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
“या कार्यक्रमाला अमित शाह येणार नाहीत. येथे न येण्याचा त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. पण आमचा भ्रमनिरास झाला, आम्हाला त्यांचं जोरदार स्वागत करायचं होतं. त्यांच्या स्वागताची योजना, कल्पना तयारी मागे पडली”, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना…”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीवर ठाकरे गटाकडून हल्लाबोल
“मराठवाड्याच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसण्यासाठी सरकार येतंय. २०१६ साली फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ४९ हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्यातील एक रुपया तरी मराठवाड्यात आला का. लातूर, नांदेड, बीड, संभाजी नगरसाठी अनेक योजना आणि घोषणा झाल्या. काय झालं त्या घोषणांचं? सव्वा लाख लोकांना दूध डेअरीच्या प्रकल्पातून रोजगार देण्याची घोषणा केली होती. आता कुठे गेल्या गायी म्हशी? गोमांश भक्षक संघकार्यकर्त्यांकडे गेल्या का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >> “या सरकारचं थाटामाटात अंत्यसंस्कार करणार”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “तीन तासांसाठी…”
“सनातन धर्मावरून आम्हाला अक्कल शिकवत आहेत. एकातरी बेगडी सनातन धर्मवाल्यांनी चार अधिकारी शहीद झाल्या त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या का? त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला घरी गेले का? पंतप्रधानांना तरी हृदय नावाची गोष्ट आहे की नाही? सनातन धर्माच्या गोष्टी करतायत. सनातन धर्माची पहिली गोष्ट आहे मानवता, मनुष्य. कुठ आहे तुमची माणुसकी? देशाच्या रक्षणासाठी जवान मरत आहे, आणि तुम्ही फुलं उधळत आहात. यालाच हुकुमशाही म्हणतात आणि याविरोधात येऊन आम्ही इंडिया आघाडीची स्थापना केली”, असंही संजय राऊत म्हणाले.
सरकार डरपोक
डरपोक आणि बेकायदा सरकार असून प्रत्येक संकटातून सरकार पळून जातंय. देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काश्मीरमध्ये कर्नल, मेजर डीएसपी शहीद झाले. चार जवान लष्करी अधिकारी एकाच वेळेला शहीद होतात. सारा देश दुःखसागरात बुडाला हे ऐकून. आणि आमचे पंतप्रधान तिथे दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयात स्वतःवर फुलं उधळून घेतली, अशी टीका राऊतांनी केली.
मला आठवतंय दिल्लीत बॉम्ब स्फोट झाले. खान मार्केटमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. तेव्हा शिवराज पाटील गेले होते. नंतर फक्त त्यांनी शर्ट बदलला. फक्त शर्ट बदलला म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काल तिकडे चार जवांनांनी हौतात्म्य पत्कारलं आणि आमचे पंतप्रधान आणि भाजपा दिल्लीतील मुख्यालयात उत्सव साजरा करत होते. स्वतःवर फुलं उधळून घेतली. हा त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा सनातन धर्म नाही. हा त्यांचा भारत वेगळा आहे, तो आमचा भारत नाही. जे जवान शहीद झाले ते भारताचे सुपूत्र होते. नुसतं इंडियाचं भारत केलं की प्रश्न सुटणार नाही. राजकीय कारणासाठी हे ढोंग बंद केलं पाहिजे. चार जवानांचं हौतात्म्य हा सनातन धर्माचा भाग होता आणि तुम्ही फुलं उधळून घेताय. हे प्रश्न आम्हाला उद्या विचारायचे आहेत. कारण देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही राजनाथ सिंहांची जबाबदरी आहे. आणि ते भाजपा कार्यालयात हजर होते. देश कोणत्या दिशेने चाललाय”, असंही संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रात काही वेगळं चाललं नाहीय. ज्या बेकायदेशीर सरकारचा निकाल चाळीस तास निकाल लागायला पाहिजे होता. पण बेकायदेशीर सरकार राज्यात निर्णय घेतंय. महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लावतंय, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला की हे सरकार बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर आहे, गोगावलेंची प्रतोद निवड बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकार बेकायदशीर आहे. पण विधानसभेचे अध्यक्ष गेल्या सहा महिन्यांपासून सुनावणी घेण्यास तयार नाही, आणि काल सुनावणी घेतली त्यालाही पुढील तारीख दिली. हे बेकायदेशीर सरकार उद्या मराठवाड्यात येणार आहे. मला असं वाटतं की या सरकारला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांचे निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. शासन आपल्या दारीचे कार्यक्रम कोट्यवधीचे कंत्राट दिले जात आहेत. हे त्यांचं रॅकेट आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांना बोलावलं जातंय. हे कुठेतरी थांबयाल हवं. यासाठी आम्ही कालपासून येथे आहोत”, असंही ते म्हणाले.