सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती. मागील जवळपास १८ महिने नवाब मलिक हे ईडीच्या कस्टडीमध्ये होते. दरम्यान, वारंवार अर्ज करूनही मलिकांना जामीन मिळत नव्हता. अखेर शुक्रवारी (११ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी (१४ ऑगस्ट) नवाब मलिकांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. शरद पवार आणि अजित पवार गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. पण तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. नवाब मलिक यांच्या विधानावरून ते अजित पवार गटात सामील होणार नाहीत, असेच संकेत मिळत आहेत. गेल्या १८ महिन्यांच्या काळात माझ्या कुटुंबासह मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे मलाही त्रास सहन करावा लागला, असंही मलिक म्हणाले.
“सध्याच्या घडीला आरोग्याची काळजी घेणं, हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेणार आहे. पुढील महिनाभरात माझी प्रकृती सामान्य होईल, अशी मला आशा आहे”, असंही मलिक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं.