Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. कारण राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व भारदस्त आणि छाप पाडणारं आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे आक्रमक आणि धोरणी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी या विधानसभा निवडणुकीत २०० ते २२५ जागा लढवण्याचं ठरवलं आहे. तसंच राज ठाकरेंनी जोरदार प्रचारही सुरु केला आहे. या सगळ्या वातावरणात कुणाल विजयकर यांच्या खाने में क्या है? या शोला राज ठाकरेंनी मुलाखत दिली.
कुणाल विजयकर आणि राज ठाकरे एकमेकांचे मित्र
कुणाल विजयकर आणि राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये हे दोघं एकाच वर्गात होते. त्यावेळी कशी धमाल करायचो? हे राज ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितलं आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले मी बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून पहिल्यांदा जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलो. पूर्वपरीक्षा वगैरे दिल्यानंतर कॉफी प्यावी म्हणून कँटिनला गेलो. तर तिथे पाहिलं एक मुलगी शॉर्ट आणि शर्टमध्ये चालत येत होती तिच्या एका हातात कॉफीचा कप आणि दुसऱ्या हाता सिगारेट होती. मी म्हटलं माझा इथे काही टिकाव लागणार नाही. नंतर जेव्हा महाविद्यालायत जाऊ लागलो तेव्हा समजलं की अनेक लोक मराठीच होते. अशी आठवण राज ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितली. तसंच याचवेळी राज ठाकरेंनी पहिली निवडणूक लढवल्याचा किस्साही सांगितला.
राज ठाकरेंचं मिसळप्रेम आणि साबुदाणा वड्याचाही किस्सा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिसळ खूप आवडते. त्यांनी मामा काणे, प्रकाश येथील मिसळ आपली आवडती असल्याचं सांगितलं. पण राज ठाकरेंना सर्वात जास्त आवडते ती म्हणजे ठाण्यातली मामलेदारची मिसळ. या मिसळीचा आस्वादही राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) घेतला. ही मिसळ प्रचंड तिखड असते दोन ते तीन महिन्यांतून एखाद्यावेळी खाऊ शकतो रोज नाही असंही राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच दादरच्या प्रकाश रेस्तराँमध्ये मिळणारा साबुदाणा वडा अप्रतिम असतो, असा साबुदाणा वडा जगात कुठेही मिळत नाही असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरेंनी पहिली निवडणूक लढवल्याचा किस्सा काय?
खाने में क्या है च्या एपिसोडमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले, “आयुष्यात मी कधीच निवडणूक लढवली नाही. मी एकदाच निवडणूक लढवली होती. ती एकमेव निवडणूक मी कॉलेजमध्ये लढवलेली होती. क्लास रिप्रेझेंटिव्ह निवडला जायचा त्याचं पद होतं CR त्यासाठी मी निवडणूक लढवली होती. दोन प्रतिस्पर्धी त्या निवडणुकीत होते एक मी (राज ठाकरे) दुसरा कुणाल विजयकर.” हा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.
त्यावर कुणाल विजयकर म्हणाले राजने जी एकमेव निवडणूक लढवली आणि जिंकली आहे ती काँग्रेसच्या किंवा भाजपाच्या विरोधातली नाही तर माझ्या विरोधातली होती. राज ठाकरे म्हणाले मी ती निवडणूक जिंकलो पण जे. जे. ला अशी परंपरा होती की निवडणूक कुणीही जिंकली किंवा हरली तरीही पार्टी कॉमन असायची. संध्याकाळी सातनंतर सांडलेले असायचे असं राज ठाकरेंनी सांगितलं.