मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे करण्यात आली. यंदा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारवर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाव कोरलं आहे. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. परंतु, जय भीम या चित्रपटाला एकही पारितोषिक मिळाले नसल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
हेही वाचा >> ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पारितोषिक द्यावंसं वाटलं. पण जय भीम या चित्रपटाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील ह्या वर्षातील चित्रपट हा ‘जय भीम’ हाच होता. लोकांच्या मनातील पारितोषिक हे ‘जय भीम’ चित्रपटालाच, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
भारतातील जातीय विषमता आणि त्यामुळे आदिवासी समूहांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना आणि जगावं लागणरं गुन्हेगारांचं जीवन जय भीम चित्रपटात दाखवण्यात आलंय. या चित्रपटाचं देशभरात कौतुक झालं. याशिवाय जगभरात याची चर्चा झाली. चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान असलेल्या ऑस्कर अकॅडमीने या चित्रपटाचा विशेष सन्मान केला होता. मात्र, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात जय भीम चित्रपटाला स्थान मिळालेलं नाही, यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.