राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर रोहित पवार हे पक्षाअंतर्गत जास्त सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता ‘युवा संघर्ष यात्रे’चंही आयोजन केलं आहे. ते राज्यभर पदयात्रा काढणार आहेत. दरम्यान, त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून सध्याच्या राजकारणावर दिलखुलास उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या स्वभावावरही भाष्य केलं आहे.
शरद पवारांची एखादी न आवडणारी गोष्ट किंवा स्वभावातला न आवडणारा पैलू कोणता आहे? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “आवडणं किंवा न आवडणं याच्यापेक्षा न कळणारा त्यांच्या स्वभावाचा एक पैलू आहे. ते उघडउघड काहीच बोलत नाहीत. आपल्याला निरीक्षण करावं लागतं, त्यांच्या मनात काय आहे? हे समजून घ्यावं लागतं. योगायोगानं आजपर्यंत त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की, तू चुकला आहेस. पण काही सुधारणा असतील तर ते अप्रत्यक्षपणे सांगतात, ते थेट तुम्हाला कधीही काहीही सांगत नाहीत.”
हेही वाचा- “माझे काका मला चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून…”, अजित पवारांबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान
“यामुळे एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे तुम्ही जज (पारख करणे) करण्याच्या नादात पवारसाहेबांचं एवढं निरीक्षण करायला लागता की, त्यानंतर तुमच्यातही तो बदल व्हायला लागतो. त्यांनी जर सर्व रेडिमेड (आयतं) दिलं असतं तर कदाचित ते बदल आमच्यात झाले नसते, ही एक चांगली बाजू आहे. ते नेहमी कोड्यात बोलतात, त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे? हे आपल्याला कळत नाही,” असंही रोहित पवारांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत”; रोहित पवारांचं स्पष्ट विधान, म्हणाले, “त्यांनी माफी…”
रोहित पवारांनी पुढे सांगितलं, “शरद पवारांच्या मनातील राजकीय रणनीतीबाबत तुम्हाला अजिबात कळत नाही. पण त्यांच्या धोरणांबद्दल तुम्हाला कळतं. कोणतंही धोरण सामान्य लोक, शेतकरी आणि कष्टकरी यांना केंद्रीत असावं, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे धोरणांबाबत ते काय निर्णय घेणार? हे १०० टक्के आपल्याला कळतं. पण राजकारणाच्या बाबतीत ते कधी काय निर्णय घेतील, हे कळत नाही.”