दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात हरणा नदीत वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला. गावातून दुसरीकडे जाण्या-येण्यासाठी नदी पार करावी लागते. नदीवर पूल बांधण्याची वर्षानुवर्षांपासूनची मागणी दुर्लक्षित आहे.
शौकत रशीद नदाफ (वय ३८) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो हॉटेल कामगार होता. मुस्ती गावालगत हरणा नदी वाहते. गेल्या आठवडाभरात दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळे हरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परंतु गावातून दुसऱ्या टोकाला जाण्या-येण्यासाठी नदीतूनच जावे लागते. नदीला पाणी आले तरी गावकरीच नव्हे तर शाळकरी मुले सुध्दा नदी पार करूनच जातात.
पावसाळ्यामध्ये नदीतील पाण्याचा प्रवाह वाढतो. तेव्हा तर जीव मुठीत घेऊनच नदी ओलांडावी लागते. आतापर्यंत अनेकवेळा नदी ओलांडताना काहीजणांचे बळी गेले आहेत. सुमारे चार हजार लोकसंख्येच्या मुस्ती गावासह नदीपलिकडेही लोकवस्ती आहे. या लोकवस्तीवरील गावक-यांना गावात जाण्या-येण्यासाठीही नदी ओलांडावी लागते. मुस्तीकडून पुढे आरळी गावाकडे जाण्यासाठीही थेट रस्ता नाही. त्यासाठी नदीच ओलांडावी लागते. दुसऱ्या पर्यायी मार्गाने अरळीकडे किंवा अन्य ठिकाणी जायचे झाल्यास १८ किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे नाइलाजास्तव बहुतांशी गावकरी नदी ओलांडून पुढे जाणे पसंत करतात.
शौकत रशीद नदाफ हा रात्री गावाच्या पलिकडे असलेल्या हॉटेलचे काम संपवून गावाकडे येण्यासाठी हरणा नदीत उतरला. नदी ओलांडताना मध्यावर पाण्याचा प्रवाह वाढला. त्याचा पुरेसा अंदाज न आल्यामुळे पट्टीचा पोहणारा असूनही शौकत नदाफ हा पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सकाळी सापडला.
या घटनेमुळे मुस्तीच्या गावक-यांचा संयम सुटला. गावाजवळ हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप गावक-यांनी केला आहे. दरम्यान, मृत शौकत नदाफ याचा मृतदेह सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात न्यायवैद्यक तपासणीसाठी आणला असता गावक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाऊन ठिय्या आंदोलन केले. हरणा नदीवर पूल बांधावे आणि मृत नदाफ याच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शासकीय रूग्णालयातही आंदोलन झाले. दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भीमाशंकर जमादार व प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शेवटी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.