चळवळ सोडून जाणारे अनेक अनुभवी सदस्य जाताना पैशांवर डल्ला मारत असल्याने सध्या नक्षलवाद्यांचे नेते हैराण झाले आहेत. संघटना विस्तारासाठी गोळा केलेला कोटय़वधीचा निधी नेमका कसा दडवून ठेवायचा, असा प्रश्न या नेत्यांना आता सतावू लागला आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण गडचिरोलीची जबाबदारी सांभाळणारा जहाल नक्षलवादी शेखरण्णाने आंध्र पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुमारे वीस वष्रे चळवळीत काढलेल्या शेखरने जाताना कोटय़वधी रुपये सोबत नेल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. पोलिसांच्या चौकशीत शेखरने सोबत पैसे आणले नाहीत, असा जबाब दिला असला तरी त्याच्या जबाबावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. नक्षलवाद्यांच्या वर्तुळातूनसुद्धा शेखरने जाताना मोठा हात मारला असेच सांगितले जात आहे. यामुळे नक्षलवादी चळवळीचा पैसे हाताळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मध्य भारतात भरपूर जम बसवलेल्या नक्षलवाद्यांची वार्षिक उलाढाल आता अडीच हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. उद्योजक, कंत्राटदार यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात गोळा केलेला हा पैसा चळवळीच्या विस्तारासाठी व शस्त्र खरेदीसाठी वापरला जातो. या चळवळीचे प्रभाव क्षेत्र प्रामुख्याने जंगलात असल्याने हा कोटय़वधीचा निधी जंगलात ठिकठिकाणी गाडून ठेवला जातो. दहा वर्षांपूर्वीपर्यंत मिळालेले पैसे गाडून ठेवण्याचे अधिकार दलम कमांडरला होते. वर्षभर या पद्धतीने निधी सांभाळल्यानंतर वार्षिक नियोजन बैठकीच्या वेळी हा निधी कमांडरकडून वरिष्ठांकडे सोपवला जात असे. नंतरच्या काळात हे कमांडर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू लागले. जाताना ते निधीवरही डल्ला मारू लागले. चामोर्शी दलमचा कमांडर पांडूने आत्मसमर्पण करताना असा डल्ला मारलाच व नंतर पोलिसांना पैसे गाडून ठेवल्याची ठिकाणे दाखवल्यानंतर ४० लाख रुपये जप्त केले होते. या घटनाक्रमामुळे खवळलेल्या नक्षलवाद्यांनी नंतर पैसा सांभाळण्याची जबाबदारी विभागीय सचिवावर सोपवली. या चळवळीत विभागीय सचिवपदी प्रामुख्याने आंध्रमधून आलेले नक्षलवादी आहेत. या पदावर असलेले सदस्य पैशाच्या बाबतीत गद्दारी करणार नाहीत, अशी अपेक्षा नक्षलवादी नेतृत्वाने तेव्हा बाळगली होती. मात्र आता त्यालाही सुरुंग लागत असल्याचे दिसून आले आहे.
काही वर्षांपूर्वी सागर नावाच्या नक्षलवाद्याने आंध्रमध्ये आत्मसमर्पण केले. जाताना त्याने सुमारे २ कोटी रुपये पळवल्याचे निष्पन्न झाले. पूर्व विदर्भात सक्रिय असलेल्या रावजी तुलावीने चळवळीतून पळून जाताना कोटय़वधी रुपये सोबत नेले. या पैशातून त्याने छत्तीसगडमधील रायपूर येथे मोठे घर विकत घेतले. तेथे काही काळ राहिल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. चळवळ सोडून जाणारे सदस्य नेहमीच नक्षलवाद्यांच्या रडारवर असतात. त्यातच त्या सदस्यांनी जाताना निधी पळवला असेल तर नक्षलवादी त्याच्या मागावर असतात. आता तशीच प्रकरणे वारंवार घडू लागल्याने पैसा सांभाळायचा कसा? असा प्रश्न नक्षलवादी नेतृत्वाला पडला आहे. खंडणीच्या स्वरूपात गोळा करण्यात आलेला हा पैसा नक्षलवादी शहरी भागात दडवून ठेवू शकत नाही. ठेवला तरी त्यात धोका असतो. त्यामुळे जंगलात पैसा गाडून ठेवणे हाच एकमेव उपाय नक्षलवाद्यांजवळ आहे. या पैशाला पाय फुटू नयेत म्हणून पैसा ठेवल्याचे ठिकाण केवळ विभागीय सचिवालाच ठाऊक असावे, असाही नियम मध्यंतरी करण्यात आला. आता ही वरिष्ठ पदावरची माणसेच धोका देऊ लागल्याने नक्षलवादी हैराण झाले आहेत.
नक्षलवाद्यांची वार्षिक उलाढाल अडीच हजार कोटींच्या घरात
निधीचा वापर चळवळीच्या विस्तारासाठी व शस्त्र खरेदीसाठी
डल्ला मारणारे नक्षलवादी
(कंसात पळवलेली रकम )
शेखरण्णा-(आकडा माहीत नसला तरी कोटय़वधींची रकम पळवल्याची चर्चा)
कमांडर पांडू – (आकडा माहीत नाही, पण पोलिसांना जागा दाखविताना ४० लाख जप्त)
सागर -(दोन कोटी पळवल्याची चर्चा)
चळवळ सोडताना खजिन्यावर डल्ला मारणाऱ्यांची वाढती संख्या
चळवळ सोडून जाणारे अनेक अनुभवी सदस्य जाताना पैशांवर डल्ला मारत असल्याने सध्या नक्षलवाद्यांचे नेते हैराण झाले आहेत. संघटना विस्तारासाठी गोळा केलेला कोटय़वधीचा निधी नेमका कसा दडवून ठेवायचा, असा प्रश्न या नेत्यांना आता सतावू लागला आहे.
First published on: 11-12-2012 at 04:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While leaving movement lump on treasury