लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : गैरव्यवहारामुळे शेतकर्‍यांची असलेली जिल्हा बँक बदनाम होत असून संचालक मंडळ बरखास्त करावे, मागील संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केली. या मागणीसाठी दि. २७ जून रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चाबूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत गैरकारभार होत असून याच्या वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नाही. काही दिवसापूर्वी बँकेच्या विविध शाखामधील कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांना शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्ती करावी, मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभाराचा ठपका चौकशी समितीने ठेवला असून सुमारे ५० कोटींचे नुकसान बँकेचे झाले असल्याचे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे. तत्कालिन संचालक मंडळावर या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशा आमच्या मागण्या असल्याचे आ. पडळकर व खोत यांनी सांगितले.

आणखी वाचा-सांगली : टँकरची तिघांना धडक; एक ठार, दोन जखमी

बँकेत गैरव्यवहार करणार्‍यावर कारवाई व्हावी, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी संघटनेच्यावतीने दि.२७ जून रोजी बँकेवर चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले. बँकेत गैरकारभार करणार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे पाठीशी घालत असल्याने या गैरकारभाराचा आमदार पाटील हेच म्होरयया आहेत असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला.

तसेच बँकेमध्ये आता ४०० पदाची नोकरभरती करण्याची योजना असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे संचालकाकडून घेतले जात असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. मागील संचालक मंडळाने नोकर भरती मध्ये संचालकांच्या जवळचेपण बँकेत काम करण्यासाठी पात्र नसणारे उमेदवार नियुक्त करण्यात आल्याचा देखील आरोप पडळकर यांनी केला.

आणखी वाचा-“…तर छगन भुजबळांना मुख्यमंत्री पदाचा टीळा लागला असता”; संजय राऊत यांचं मोठं विधान

दत्त इंडिया, वसंतदादा कारखाना आणि जिल्हा बँक त्रिपक्षिय कराराने वसंतदादा कारखाना भाडेकराराने चालविण्यास देण्यात आला. मात्र मद्यार्क प्रकल्प देण्यात आला नाही. या मद्यार्क प्रकल्पाचा प्रतिकात्मक ताबा बँकेचा असताना दत्त इंडिया कसा चालवू शकते? मद्यार्क प्रकल्प परवाना स्वप्नपूर्ती कारखान्यास कसा मिळतो असे सवालही खोत यांनी यावेळी उपस्थित केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whip march will be held to appoint an administrator to district bank due to mismanagement say sadabhau khot and gopichand padalkar mrj