गडचिरोलीनंतर प्रथमच चंद्रपूरमध्ये नोंद
अतिशय दुर्मीळ अशा पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा शोध सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाडजवळ पेठगाव येथे लागला आहे. तेथील एका झाडावर पांढऱ्या पाठीची १७ गिधाडे मुक्कामाला आहेत. चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य संरक्षक संजय ठाकरे यांना ही माहिती मिळताच त्यांनी गिधाडांसाठी रानडुक्कर व मृत गुरांची खानावळ तयार केली आहे. गडचिरोलीनंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्य़ात या गिधाडांची नोंद घेण्यात आली आहे.
या गिधाडांची नोंद गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील कुनघाडा, रांगी, तसेच सिरोंचा तालुक्यात घेण्यात आली आहे. या गिधाडाचे शास्त्रीय नाव निओफ्रॉन पर्कनॉप्टेरस असे आहे. आकाराने हे घारीएवढे असून, मळकट पांढरे असते. त्याचे डोके पीसविरहित व पिवळे असते. उड्डाणपिसे काळी असतात. पंख लांब आणि टोकदार, तर शेपूट पाचरीसारखे असते. मादी दरवेळी दोन अंडी घालते. ती पांढरी किंवा फिकट विटकरी रंगाची असून त्यावर तांबूस किंवा काळे डाग असतात. याच्या विणीचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल असा असतो. ही गिधाडे दक्षिण युरोप आणि आफ्रिकेत, तसेच आसामात आढळतात. गडचिरोलीतील ही गिधाडे चंद्रपूर जिल्ह्य़ातही यावीत, या दृष्टीने दोन वर्षांंपासून प्रयत्न सुरू होते, परंतु यात वनखात्याला सातत्याने अपयश आले. कधी काळी सात बहिणींचे डोंगर परिसरात या गिधाडांची नोंद घेण्यात आली होती, परंतु गेल्या काही वषार्ंत तर चंद्रपुरात ती दृष्टीसच पडली नाहीत.
पेठगाव या छोटय़ा खेडय़ात एका झाडावर या गिधाडांची नोंद घेण्यात आलेली आहे. पेठगाव येथे गिधाडे मिळाल्याची माहिती क्षेत्र सहायक कोडापे व राठोड यांनी संजय ठाकरे यांना देताच त्यांनी पेठगावला जाऊन पाहणी केली. या गिधाडांच्या संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी चंद्रपूर वनवृत्ताने घेतली असून, त्यासाठी खास पेठगावला झाडाखालीच खाणावळ तयार करण्यात आली आहे. यात जंगलात ठार करण्यात आलेली रानडुक्कर, तसेच गुरेढोरे टाकण्यात आली आहेत. त्यांची गर्दी दिवसभर बघायला मिळते. संध्याकाळी ही सर्व गिधाडे झाडावर एकत्र मुक्कामाला असतात. गिधाडांच्या नोंदीची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
दुर्मीळ पांढऱ्या पाठीची १७ गिधाडे चंद्रपूरमुक्कामी
अतिशय दुर्मीळ अशा पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा शोध सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाडजवळ पेठगाव येथे लागला आहे.
Written by रवींद्र जुनारकर

First published on: 13-05-2016 at 01:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White backed vulture