कोळसा, पाणी आणि गॅसटंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीज प्रकल्प चालविण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागत असून पर्यायी ऊर्जास्रोतांसाठी आता देशभर मोठय़ा प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची काळाची निकड असतानाच पर्यायी इंधन म्हणून शेतातील काडी-कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ‘व्हाइट कोल’ने ऊर्जेची गरज भागविली जाऊ शकते, याकडे इंडो-इस्रायल कृषी विकास संस्था आणि न्यू हॉलंड ट्रॅक्टर्सच्या चर्चासत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. या उद्योगामध्ये विदर्भात सुमारे २०० कोटींची तर राज्यात ५ हजार कोटींची उलाढाल होऊ शकते. परंतु, निव्वळ मोठय़ा उद्योगांना प्रोत्साहन देण्याची पावले उचलणाऱ्या प्रगत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ‘व्हाइट कोल’ची कारखानदारी संपूर्णपणे दुर्लक्षित आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी शेतातून कोटय़वधी टन कचरा निघत असून त्याचा काहीही उपयोग न करता तो एकतर फेकला किंवा जाळून टाकला जातो. यामुळे प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. कापूस पऱ्हाटी, सोयाबीन भुसा, धानाचा भुसा, शेंगदाणा, एरंडीची टरफले, लाकडी भुसा, गव्हाचा भुसा, सूर्यफुलांचे टरफल, उसाचे चिपाड, तागाचा चोथा आदींपासून ब्रिकेट्स (व्हाइट कोल) तयार करता येतात. व्हाइट कोल हे बायोकोल ऊर्जेचे घनस्वरूप आहे. एक उद्योग दहा तासात १२० ते १५० क्विंटल व्हाइट कोलचे उत्पादन करू शकतो. व्हाइट कोल प्रती क्विंटल ४०० रुपये प्रमाणे खरेदी केला जात आहे. त्यानुसार दररोज १०० क्विंटलचे उत्पादन केले तरी ४० हजार रुपयांचे उत्पादन घेता येऊ शकते. एका कारखान्यात दहा लोकांना रोजगार मिळण्याची संधी आहे. शिवाय त्यावर आधारित ट्रॅक्टर, मशीन यातूनही अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. रोजगाराची एवढी मोठी संधी असताना याकडे कारखानदारांचे लक्ष गेलेले नाही.
‘व्हाइट कोल’ हा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत असून वातावरण समतोल राखणारा असून तो तयार करण्यासाठी द्रव पदार्थ, रसायने व रासायनिक प्रक्रिया करावी लागत नाही. ही नैसर्गिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. ‘अ‍ॅग्रोवेस्ट’चा उपयोग देशात पेपर मिल्स, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट्स, कापड गिरण्या, फळ प्रक्रिया उद्योग, दूध, साखर कारखाने, चामडे आदी उद्योगांमध्ये होत आहे. या उद्योगाचे ग्रामीण पातळीवर भरपूर फायदेही आहेत. शेतक ऱ्यांना पऱ्हाटीचे बांधावरच चीपिंग करून २०० रुपये प्रतिक्विंटल या दराने उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी शेतक री पुत्रांना शासन, बँका आणि वीज कंपनीने अर्थसाह्य़ उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे निर्माण करता येऊ शकते. दगडी कोळशाच्या तुलनेत व्हाइट कोलची किंमत खूपच कमी आहे. शिवाय राख हवेत उडत नसल्याने वातावरणही प्रदूषित होत नाही. व्हाइट कोलचा वापर घरगुती इंधन म्हणून केल्यास जंगलतोडीची वेळ येणार नाही शिवाय गॅसचीही मोठय़ा प्रमाणावर बचत केली जाऊ शकेल. परंतु ‘व्हाइट कोल’च्या महत्त्वाची अद्यापही शेतकरी आणि सरकारांना जाणीव झालेली नाही.