परभणीत ४४०० रुपये भाव
गेल्या तीन महिन्यांपासून ४ हजार रुपयांच्या आतच रेंगाळणाऱ्या कापसाच्या बाजारभावाने अचानक उसळी मारली आहे. परभणीच्या बाजारपेठेत गुरुवारी तब्बल ४ हजार ४०० रुपये क्विंटल भावाने कापसाची खरेदी झाली. परंतु नेमका भाव वाढला असताना जिल्ह्य़ात शेतकऱ्यांकडील कापूस संपत आला आहे. आधी बाजारभाव वाढत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विकून टाकला. व्यापाऱ्यांनी या सर्व कापसाची खरेदी करून ठेवली. आता नेमका कापसाचा भाव वाढला नि शेतकऱ्यांकडे मात्र कापूस नाही. साहजिकच पांढरे सोने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच धार्जिणे असल्याचे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले.
परभणीच्या बाजारपेठेत गुरुवारी लिलावाद्वारे कापसाला किमान ४ हजार २०५, तर कमाल ४ हजार ४०० रुपये भाव मिळाला. सरासरी ४ हजार ३७५ रुपयांनी खरेदी करण्यात आला. परभणीची बाजारपेठ कापसासाठी मराठवाडय़ात प्रसिद्ध आहे. परभणीत सीसीआयमार्फत २,३९९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. खासगी व्यापाऱ्यांमार्फत तब्बल ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. गेल्या ७ नोव्हेंबरपासून यंदाची कापूस खरेदी सुरू झाली. बहुतांश कापसाची आवक् थंडावली आहे. शेतकऱ्यांकडे अपवादानेच कापूस आहे. साहजिकच पांढरे सोने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच धार्जिणे असल्याचे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले.
कापसाच्या आयात-निर्यातीची धोरणे शेतकऱ्यांना कदाचित कळणार नाहीत. आयात व निर्यात केव्हा होते, हेसुद्धा शेतकऱ्यांच्या आकलनाच्या पलीकडे आहे. मात्र, आपल्याकडील कापूस विक्रीस जात असताना त्याला चांगला भाव मिळत नाही व आपल्याकडचा कापूस संपतो तेव्हाच कापसाचे भाव वाढतात. हे असे का, हे कोडे शेतकऱ्यांना कायम पडत आले आहे. नेमका बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळू नये यासाठीचे षड्यंत्र जाणीवपूर्वक कसे आखले जाते आणि या कारस्थानात नेमके आहेत तरी कोण, याचा विचारही शेतकरी करू शकत नाहीत, अशी अगतिक स्थिती आहे.

Story img Loader