निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं आहे. अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे. त्याच निकषावर हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. अजित पवारांकडे सध्या महाराष्ट्रातले ४१ आमदार आहेत. तर शरद पवारांकडे १५ आमदार आहेत. असं जरी असलं तरीही जी प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहेत त्यात पाच आमदारांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रं दिली आहेत. तर एका खासदारानेही दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं आहे.
जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
राष्ट्रवादीत जुलै २०२३ च्या महिन्यात दोन गट पडल्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला होता. निवडणूक आयोग काय निकाल देणार? याची उत्सुक्ता होती. आज घडीला बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. मात्र शरद पवार राजकारणात आजही सक्रीय आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा मीच आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोग शिवसेनेपेक्षा काही वेगळा निर्णय देणार का? याची चर्चा सुरु होती. मात्र निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना दिलं आहे.
निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि नेत्यांचा एक गट शिवसेना-भाजपा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. त्याचवेळी शरद पवार गट विरोधी बाकांवर बसला. दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने ही सुनावणी सुरु होती.
ते पाच आमदार आणि एक खासदार कोण?
या सगळ्या गोष्टी घडल्या असल्या तरीही दोन्ही बाजूंनी सह्या करणारे पाच आमदार आणि एक खासदार हे कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र पाच आमदार हे दोन्ही बाजूने असल्याने त्यांच्या भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचं दिसतं आहे. अशात हे पाच आमदार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पाच आमदारांनी आणि एका खासदाराने जर अजित पवारांसह जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांसाठी तो झटका असणार आहे. दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र देणारे हे पाच आमदार आणि खासदार कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र विविध नावांची चर्चा आता सुरु झाली आहे.
हे पण वाचा-‘थकणार नाही, झुकणार नाही, कुणाला सांगताय म्हातारा झालोय’, राष्ट्रवादीने पोस्ट केला शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ
अजित पवारांकडे किती संख्याबळ? (शपथपत्र दिल्यानुसार)
महाराष्ट्र- ४१ आमदार
नागालँड-७ आमदार
झारखंड-१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद- ५ आमदार
राज्यसभा १ खासदार
शरद पवारांसह किती आमदार? (शपथपत्र दिल्यानुसार)
महाराष्ट्र – १५ आमदार
केरळ -१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद -४ आमदार
लोकसभा खासदार-४
राज्यसभा ३
सध्याच्या घडीला असं संख्याबळ दोन्ही गटांकडे आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पाच आमदार आणि एक खासदार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.