उमाकांत देशपांडे

मुंबई : भाजपच्या पारंपरिक मतदारांनी उत्साहाने झुंडीच्या झुंडीने येऊन आणि मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केले. बोरीवली, चारकोप, अंधेरी, दहिसर आदी परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला. पण मालाड, गोराई, मालवणी व अन्य भागांमधील मतदान केंद्रावरही आगरी, कोळी आणि अन्य मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मुस्लीम मतदारांचे मतदानाचे प्रमाणही लक्षणीय होते. त्यामुळे महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांना महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील हे चांगली लढत देतील, अशी अपेक्षा आहे.

पीयूष गोयल हे उत्तर मुंबईत राहात नसल्याने उपरे किंवा पक्षश्रेष्ठींनी पाठविल्याने ‘पॅराशूट’ उमेदवार असा प्रचार काँग्रेस उमेदवाराने केला. गोयल हे मंत्री व ज्येष्ठ नेते असल्याने आणि स्थानिक नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची त्यांना जाण नाही व ते सोडवूही शकणार नाही. मी स्थानिक उमेदवार असून आतापर्यंत हजारो नागरिकांना मदत केल्याचा दावा काँग्रेसचे भूषण पाटील यांनी केला. पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व मुस्लीम कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर उतरले. गेल्या निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांना सुमारे चार लाख ६५ हजारांचे मताधिक्य मिळाले. गेल्या वेळी काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना २,४१,४३१ मते मिळाली होती. मात्र यंदा ठाकरे गट काँग्रेसबरोबर असल्याने पाटील यांच्या मतांमध्ये भरीव मतांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोयल यांना मताधिक्य टिकविण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा >>>महाराष्ट्रात महायुतीच पुढे! ‘द स्ट्रेलेमा’च्या मतदानोत्तर चाचणीत मतदारांचा कल महायुतीला अनुकूल

उत्तर मुंबईत बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा होत्या. पण मतदानाचा वेग कमी असल्याने रांगा होत्या आणि अनेकांनी रांगा पाहून व मोबाइल नेण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने मतदानासाठी न जाणे पसंत केले. त्यामुळे अनेक भाजप समर्थक मतदार मतदान करू शकले नसल्याचे सांगितले जाते. गेल्या वेळची निवडणूक एकतर्फी झाली होती आणि भाजपचे उमेदवार शेट्टी हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यंदा मात्र स्थानिक प्रश्न, शिवसेनेतील फूट आणि अन्य मुद्द्यांचा प्रभाव निवडणुकीत होता आणि मोदी लाट पूर्वीइतकी प्रभावी नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे भाजपसाठी एकतर्फी विजयाची शक्यता कमी असून काँग्रेस उमेदवार पाटीलही चांगली मते घेतील, अशी चिन्हे आहेत.

कल्याण: मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

भगवान मंडलिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांमध्ये असलेली धुसफुस शिंदे यांच्यासाठी किती डोकेदुखीची ठरते यावर येथील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी वैशाली दरेकर यांना रिंगणात उतरविण्यात आले. शिंदे यांच्याविरोधात या मतदारसंघातून आगरी समाजातील उमेदवार असावा यासाठी ठाकरे गटाकडून सुरुवातीला प्रयत्न झाले. परंतु मुख्यमंत्री पुत्राविरोधात लढण्यासाठी चर्चेत असलेल्यांपैकी कुणीही पुढे आले नाहीत. असे असले तरी डॉ.श्रीकांत यांच्याविरोधात मित्र पक्ष असो वा विरोधी पक्ष एका मोठ्या वर्गात शेवटपर्यंत नाराजीचा सूर होता. याचा एकत्रित परिणाम किती होतो याविषयी उत्सुकता कायम आहे.

मागील चार वर्षात डॉ.शिंदे यांच्या नावावर अनेक मोठ्या विकासकामांची नोंद झाली. मुख्यमंत्री पुत्राचा मतदारसंघ असल्याने रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर विकास प्राधिकरण यासारख्या संस्थांनी हजारो कोटी रुपयांची कामे या भागात केली. ही कामे करत असताना भाजप, मनसे पक्षातील नेत्यांना खासदारांनी फारसे ‘विश्वासात’ घेतले नाही अशी नाराजी दबक्या आवाजात होती. कल्याणात खासदार म्हणतील ती पूर्व दिशा असा कारभार होता. त्यामुळे भाजपचे या भागातील मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही शिंदेंपुढे काही चालत नाही. भाजप, मनसेचा कार्यकर्ता तर उपेक्षित राहिला. निवडणुकांच्या धामधुमीत या सगळ्या नेत्यांची मोट बांधण्यात शिंदे यांना यश आल्याचे चित्र होते. मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातील नाराजी दूर झाली होती का हा प्रश्न अजूनही दबक्या आवाजात चर्चिला जात आहे. वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीमुळे आपला मार्ग एकतर्फी झाला, अशी गणिते शिंदे यांच्या गोटात केली जात होती. अखेरच्या टप्प्यात खुद्द मुख्यमंत्र्यांना कल्याणात लक्ष घालावे लागल्याची चर्चा होती. शिंदे महायुतीचे उमेदवार होते. परंतु प्रचारात भाजप, मनसे, अजित पवारांची राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष होते कुठे असाही प्रश्न होताच. डोंबिवलीत भाजपमधील शुकशुकाट, कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील यांच्या समर्थकांमधील नाराजी, कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांची अस्वस्थता अगदी स्पष्टपणे दिसत होती. मुंब्रा भागात मोठे मतदान झाले. येथे शिंदे यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. ती प्रत्यक्षात किती कामी आली हा प्रश्नही कायम आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीणमध्ये ५१ टक्के, मुंब्रा कळवा ४८ टक्के, अंबरनाथ ४७ टक्के, उल्हासनगर ५१ टक्के असे मतदान झाले. हे शिंदे यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते.

ठाणे : मोदींच्या करिष्म्यावर मुख्यमंत्र्यांची मदार

जयेश सामंत, नीलेश पानमंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची संपूर्ण मदार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू या निवडणुकीत किती चालते यावर असणार आहे. या मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी रंगतदार लढत झाली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत हाडाचा शिवसैनिक कुणाच्या बाजूने कौल देतो याविषयी उत्सुकता आहे. असे असले तरी नवी मुंबई, मीरा-भाईदर आणि ठाण्यातही मोठया संख्येने असलेला मोदीनिष्ठ मतदारांची मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला किती साथ मिळते यावर येथील निकालाची गणिते अवलंबून आहेत.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली. तर, उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या दोन दिवस आधी महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे प्रचारात विचारे यांनी आघाडी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना रिंगणात उतरविले. हा मतदारसंघ भाजपला सुटला नाही. त्यामुळे नवी मुंबईतील नाईक कुटुंबीयांसह भाजपचा एक मोठा वर्ग या निर्णयावर नाखूश दिसला. तरी मतदानाच्या दिवशी नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईदर शहरातील उच्चभ्रू वस्त्या, नौपाडा, भाईंदरसारख्या भाजपनिष्ठ भागातून मतदानासाठी लागलेल्या लांबच्या लांब रांगांमुळे मुख्यमंत्र्यांच्या गोटात समाधानाचे वातावरण दिसले. या मतदारसंघात म्हस्के यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर, विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्यामुळे नाराजी बाजूला सारून युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करण्याचा सल्ला भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. २०१९ च्या निवडणुकीत ५०.५८ टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ५२.०९ टक्के इतके मतदान झाले आहे. यामुळे मतदान टक्केवारीत दीड टक्क्यांनी इतकी वाढ झाली आहे. तसेच गेल्या निवडणुकीत विचारे हे ४ लाख १२ हजार १४५ मताधिक्याने विजयी झाले होते.

मुंबई : मराठी, मुस्लीम मते निर्णायक

प्रसाद रावकर

मुंबईच्या एका टोकाला असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असून काही वर्षांपूर्वीच एकमेकाच्या खांद्याला खांदा भिडवून लढणारे आज परस्परांविरोधात ठाकले आहेत. संमिश्र लोकवस्ती असलेल्या दक्षिण मुंबईमधील मराठी आणि मुस्लीम मतपेढीचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ५०.०६ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत ५१.४६ मतदान झाले होते. त्या तुलनेत साधारण दीड टक्क्याने मतदान कमी झाले. एकेकाळी या मतदारसंघात मराठी मतांचा टक्का अधिक होता. मात्र कालौघात मराठी टक्का घसरत गेला आणि अमराठी मतदारांची संख्या वाढली. मात्र असे असले तरीही आजवरच्या निवडणुकांमध्ये मराठी टक्का निर्णायकी ठरत आला आहे.

कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा आणि शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघांचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना तीन, भाजप दोन, काँग्रेस एक असे संख्याबळ या लोकसभा मतदारसंघात होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे दोन, भाजप दोन, काँग्रेस एक आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) एक असे बलाबल झाले. महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र महायुतीचा उमेदवार बराच काळ निश्चित होत नव्हता. अखेर महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरचढ ठरले आणि हा मतदारसंघ मिळविण्यात त्यांना यश आले. त्यांनी या मतदारसंघातून मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी, आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आदित्य ठाकरे, तर शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी, तर मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत. या तीन मतदारसंघात अरविंद सावंत यांना मतांची मोठी रसद मिळू शकेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर एकेकाळच्या गिरगाव, कुंभारवाडा, खेतवाडी आदी भागांतील उद्धव ठाकरे समर्थकांची मतेही सावंत यांच्या झोळीत पडतील. मागील निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव निवडून आल्या होत्या. तर माझगावमध्ये यशवंत जाधव यांचे वर्चस्व आहे. परिणामी, भायखळा आणि माझगावमध्ये यामिनी जाधव यांना आघाडी मिळू शकेल. भाजपचे राहुल नार्वेकर कुलाब्यातून, तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून विजयी होऊन विधानसभेत गेले आहेत. कुलाबा आणि मलबार हिल मतदारसंघातील भाजपची मतपेढी यामिनी जाधव यांच्या कामी आली तर या मतदारसंघातील लोकसभा निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्याचबरोबर मुस्लीम मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.