शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आगामी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा मूळ निर्णय नेमका कुणाचा होता? हा प्रश्न अद्याप कायम आहे. पण या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत गेल्या. त्यामध्ये कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मी जबाबदारीने हे वक्तव्य करतोय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, हा माझा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, हा माझ्यासाठी धक्का नव्हता.
हेही वाचा- …अन् शरद पवारांनी थोडक्यात उरकलं भाषण, प्रकृतीचं कारण देत म्हणाले, “आज मला…”
“पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा माझ्याशी चर्चा केली, तेव्हा ते या निर्णयावर ठाम होते. त्यांनी ज्याप्रकारे मला समजावून सांगितलं, त्यामध्ये पार्टीचं हित होतं. जेव्हा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होतो, तेव्हा माझ्या मनात विविध प्रकारचे विचार सुरू होते. ते चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसत होते, ही बाब मी लपवणार नाही. पण या निर्णयानंतर महाराष्ट्र आणि देशातून मला प्रचंड पाठिंबा मिळाला” असंही फडणवीस म्हणाले.
“मुख्यमंत्री बनून माझं कर्तृत्व जेवढं वाढलं असतं, तेवढंच उपमुख्यमंत्री बनून माझं कर्तृत्व वाढलं. आम्ही जे परिवर्तन केलं, ते महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचं आहे, हे लोकांना समजलं. जेव्हा तुम्ही असं परिवर्तन करत असता, तेव्हा तुम्हाला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा घेतलेल्या निर्णयावर आता पूर्णपणे समाधानी आहे” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.