लोकसत्ता वार्ताहर
परभणी : सहा पदरी रस्त्यासाठी एक किलोमीटरला ३० ते ३५ कोटी रुपयांचा खर्च आहे मात्र ८०२ किलोमीटरच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची किंमत ८६ हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यानुसार एक किलोमीटरचा खर्च १०७ कोटी रुपयापर्यंत जात आहे. मग हे वाढीव पन्नास हजार कोटी नेमके कोणाच्या घशात जात आहेत असा आरोप माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
परभणी दौऱ्यावर आलेल्या शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख किशोर ढगे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाने नागपूर ते गोवा या प्रस्तावित केलेल्या शक्तिपीठ महामार्गाला मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यकर्त्यांनी जी आश्वासने दिली त्याचा आता त्यांना विसर पडला आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी पळवाट शोधली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबरोबरच लाडकी बहीण योजनेचा निधी दीड हजारावरून २१०० रुपये करण्याचे जाहीरनाम्याद्वारे घोषित केले होते. आता मात्र कर्जमाफीचे नावही महायुतीचे लोक काढत नाहीत आणि लाडकी बहीण योजनेचा निधीही वाढवण्याबाबत असमर्थता व्यक्त करत आहेत. हा सारा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची उघड उघड फसवणूक आहे असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
शेट्टी म्हणाले की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकरीविरोधी विधाने करीत असल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. शेतकऱ्याची बदनामी करणाऱ्या व्यक्तीस मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. पिकविम्याबाबत बोलताना शेट्टी यांनी आता या योजनेत दलाल सक्रिय झाल्याचे निरीक्षण नोंदवले. कंपन्यांची मनमानी आधीपासूनच आहे आता त्यात दलालांची भर पडल्याचा आरोप त्यांनी केला.