धाराशिव : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्यातील अनेक दुर्मिळ, मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी असलेले महंत अद्यापही फरार आहेत. खजिन्याच्या चाव्या सांभाळणारे लाचखोरीमुळे लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे निलंबित आहेत. त्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या आता कोणाकडे? हा मौल्यवान खजिना कोण सांभाळत आहेत? याविषयी तुळजापूरसह परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार तुळजापूर पोलिसांनी तुळजाभवानी देवीचे महंत, धार्मिक व्यवस्थापक, सेवेदारी आणि मंदिर संस्थानमधील सात जणांवर मौल्यवान दागिने गहाळप्रकरणी महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा या चार महंतांसह मयत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी अशा सात जणांचा समावेश आहे. यातील महंत चिलोजी बुवा यांच्याकडे देवीच्या खजिन्याच्या चाव्या होत्या. ते अद्याप फरार आहेत. तसेच मंदिराचे मुख्य लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे हे एका शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी सहा लाख रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीने पकडले. आता ते निलंबित आहेत. सध्या मंदिर संस्थानमधील देवीच्या खजिन्याच्या चाव्यांची जबाबदारी जबाबदार व्यक्तीकडे आहे का? याबाबत तुळजापूर शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा-ज्यांना कारखाना चालवता येत नाही ते खासदार होऊन काय करणार- अजित पवार
सजगपणे जबाबदारी निश्चित करा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीसाठी भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेली पुरातन ७१ नाणी, मुकूट, सोन्याची गरसुळी व अन्य सोन्या-चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारणार्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे. आरोपी फरार आहेत. दरम्यान देवीचे मौल्यवान व पुरातन दागिने मागील अनेक वर्षांपासून असुरक्षित होते, याचा प्रत्यय जिल्हाधिकार्यांच्या चौकशी समितीच्या अहवालातून आला आहे. संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी देवीच्या खजिन्याच्या चाव्या जबाबदार व्यक्तीकडे दिल्या आहेत का? याबाबत तुळजापूरवासीयासह भाविकांंच्या मनात शंका आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी याबाबत अधिक सजगपणे जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केली आहे.