मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेले नेते मनोज जरांगे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविवारी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत देवेंद्र फडणवीस यांनाच मराठा विरोधी म्हटलं. तसंच त्यांच्यावर विविध आरोप करुन ते मुंबईला येण्याच्या दिशेनेही निघाले होते. अशात सोमवारी सकाळी ते त्यांच्या गावी परतले. त्यानंतरही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दंगल घडवून आणायची होती असा आरोप केला. या मुद्द्यावरुन मनोज जरांगे हे चर्चेत आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत वापरलेली भाषा ही राजकीय असून त्यामागे कोण आहे त्याचा तपास केला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
आज झालेल्या अधिवेशनातही मनोज जरांगे यांचा मुद्दा गाजला. मनोज जरांगेंनी जे वक्तव्य केलं त्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट आहे, असाही आरोप झाला. या आरोपाला आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आज मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरु केलं आहे त्याची एसआयटी चौकशी करण्याचाही ठराव झाला. ही एसआयटी चौकशी सरकारने चिवटपणे करावी त्यात कोण कोण आहेत? कुणाला कुणाचे फोन जात होते ते तपासलं पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच रश्मी शुक्ला यांना जर आता मुदतवाढ दिली आहे तर मनोज जरांगेच्या फोनवर कुणाचे फोन आले ते त्यांना माहीत असेल असाही टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
मनोज जरांगेंच्या मागे का लागता?
मनोज जरांगे जेव्हा आंदोलनाला बसले होते त्यादिवशी लाठीचार्ज केला गेला. छऱ्यांच्या बंदुका वापरल्या गेल्या, अश्रूधूर मारा झाला. अतिरेकी घुसलेत असं वागवलं गेलं. आमच्याकडून कोणी किती फोन केले? रश्मी शुक्लांना जरा विचारा. देवेंद्र फडणवीसांनी तो रेकॉर्ड घ्यावा. आम्ही जरांगेंच्या मागे असलो तरीही त्यांचं काय चुकतंय ते सांगा. कुणीही आंदोलनाला उभं राहिलं तर त्यांना गुन्हेगार ठरवलं जायचं? एखाद्याची मागणी पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे महत्त्वाचं असतं. जो विश्वासात घेऊ शकत नाही असा राज्यकर्त बिनकामाचा असतो. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
गुलाल कुणी उधळला?
मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? मनोज जरांगेंच्या मागे लागण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा. आम्ही त्यांच्या मागे आहोत असा आरोप करत असाल तर एक ते दीड महिन्यापूर्वी गुलाल कुणी उधळला होता? फटाके कुणी फोडले होते? जर तुम्ही त्यांची एसआयटी लावणार असाल तर चिवटपणाने चौकशी करा, मधेच सोडून देऊ नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.