राज्यात कोणतेही सरकार आलं तरी अजित पवार याचं उपमुख्यमंत्री पद ठरलेलं असतं. तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ७२ तासांच्या सरकारमध्येही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसेच, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बनलेल्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते. पण, कोणत्या मुख्यमंत्र्यांकडून शिकण्यास मिळालं, यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार म्हणाले की, “अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं. सुधाकर नाईक, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंचा त्यात समावेश आहे. आमदार असताना शरद पवार, नारायण राणे आणि नारायण राणे मुख्यमंत्री होते. पण, आमदार असताना मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या कामाचा ठसा मनात उमटला. कारण, शरद पवार पक्षभेद मानत नसत. राज्यात हित कशात आहे, हे पाहिलं. मग पक्ष वगैरे नंतर,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “सत्यजीतसाठी शरद पवारांनी खरगे यांना फोन केला होता, पण…”, अजित पवारांचा मोठा खुलासा
“विलासराव देशमुखांच्या कामाची पद्धत मला आवडायची. विलासराव देशमुख हे दिलदार व्यक्ती होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना ६ लोकांनी बंड केलं होतं. त्यात विलासराव देशमुख, रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, स्वरूपसिंग नाईक आणि अजून काही नेते होते. पण, एकत्र काम सुरु केल्यानंतर मी, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील सर्वजण हे सर्वजण नवीन होतो. या सर्वांना शरद पवारांनी कॅबिनेटमंत्री पद दिलं. आमचे प्रमुख विलासराव देशमुख होते. त्यांना प्रशासनाचा अनेक वर्षांचा अनुभव होता. कारण, त्यांनी शरद पवार, शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर काम केलं होतं.”
हेही वाचा : शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सांगितले होते, पण…”
“वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात विलासराव राज्यमंत्री होते. पण, ८ वर्षे मुख्यमंत्री असताना विलासरावांनी सहकारी म्हणून वागवलं. तसेच, आघाडी सरकारच्या काळात नेहमी जिल्हापरिषद, तालुका पंचायत, विधानसभा, लोकसभेत चांगलं यश मिळालं होतं. सुशीलकुमार शिंदे हे एकवर्ष मुख्यमंत्री होते. सुशीलकुमार शिंदेंनी जयंत पाटलांना सामाजिक अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली. २००४ साली राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्वात जास्त आमदार आले,” असं अजित पवारांनी सांगितलं.