Who is Lalit Patil? :ललित पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. तसंच मी या प्रकरणात मोठी नावं उघड करेन असाही दावा ललित पाटीलने केला आहे. ललित पाटील पुण्यातल्या ससून रुग्णालयात होता. बंगळुरूहून चेन्नईला जात असताना त्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. एखाद्या सिनेमात किंवा वेब सीरिजमध्ये जसं दाखवण्यात येतं त्या पद्धतीने ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळ काढला होता. मात्र त्याला अटक करण्यात आली. ज्यानंतर ड्रग्ज रॅकेटही समोर आलं. ललित पाटील हा आधी २०२० मध्येही पोलिसांना रडारवर होता. कारण पिंपरी चिंचवडमध्ये जे ड्रग्जचं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं त्यात प्रामुख्याने त्याचं नाव समोर आलं होतं. त्याला अटकही झाली होती.
ललित पाटीलवर कशी कारवाई करण्यात आली?
१० डिसेंबर २०२० : ललित पाटीलला ड्रग्ज तस्करी प्रकरणात पिंपरी पोलिसांनी चाकणमधून अटक केली.
जानेवारी २०२१ : ललित पाटीलची येरवडा तुरुंगात रवानगी
सप्टेंबर २०२३ : पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या गेटवर २ कोटींचं ड्रग्ज जप्त
१ ऑक्टोबर २०२३ : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलचं नाव समोर
२ ऑक्टोबर २०२३ : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ललितने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला
३ ऑक्टोबर २०२३ : ललित पाटीलला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी १० पथकं तयार केली.
६ ऑक्टोबर २०२३ : ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील या दोघांकडून चालवण्यात येणाऱ्या नाशिकच्या ड्रग्ज कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली.
१० ऑक्टोबर २०२३ : ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला अटक
१६ ऑक्टोबर : ललितचा भाऊ भूषण आणि अभिषेक बलकवडे या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
१८ ऑक्टोबर २०२३ : ललित पाटीलला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक
याच दिवशी ललित पाटीलला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. छोटा राजनच्या टोळीशी हा संबंधित होता. आता आपण जाणून घेऊ कोण आहे हा ललित पाटील?
कोण आहे ललित पाटील?
ललित पाटील हा छोटा राजनशी संबंधित गँगशी संबंधित होता. छोटा राजनच्या गँगशी संबंधित गुंडांशी त्याची ओळख तुरुंगात झाली होती असं म्हटलं जातं. त्यानंतर एक गुप्त ट्रेनिंग कँप झाला. त्यात ड्रग्ज कशी ओळखायची, त्याची तस्करी कशी करायची याचं ट्रेनिंग त्याला देण्यात आलं. मेफाड्राईन ड्रग ओळखायचं कसं ते देखील याच एका ट्रेनिंगमध्ये तो शिकला. Mephedrone ला म्यांऊ म्यांऊही म्हणतात.
ललित पाटीलची दोन लग्न झाली आहेत
ललित पाटीलचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब आहे. ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर ललित पाटीलने दुसरं लग्न केलं. अपघातात दुसऱ्या पत्नीचं निधन झालं. ललित पाटीलचा एक मुलगा आठवीत तर मुलगी नववीत शिकते. भूषण पाटीलचंही लग्न झालं आहे. भूषणचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. टाइम्स नाऊने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
ललित पाटील सुरुवातीला वाईन कंपनीत करत होता काम
ललित पाटील हा सुरुवातीला वाईन कंपनीत कामाला होता. त्यानंतर ललित पाटील तीन ते चार वर्षे बोकड विक्रीचा व्यवसायही करत होता. तसंच टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम करत होता. २०२० मध्ये समीर वानखेडेंनी पालघरमध्ये ड्रग्ज रॅकेटवर छापा मारला होता. त्यावेळी छोटा राजनचे साथीदार अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळावा म्हणून ललित पाटीलने मदत केली होती. नंतर चाकण पोलिसांनी अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं. आता ललित पाटीलला पुन्हा अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलच्या चौकशीत काय काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.