सोलापूर : मोहोळ राखीव विधानसभा जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुनश्च दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे इच्छुकांची भाऊगर्दी झालेल्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीची लॉटरी कोणाला मिळणार, याची सार्वत्रिक उत्सुकता कायम आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बबनराव शिंदे (माढा) व त्यांचे बंधू संजय शिंदे (राष्ट्रवादी- अजित पवार पुरस्कृत अपक्ष, करमाळा) या दोघांनी शेवटच्या क्षणी अजित पवार यांची साथ सोडून अन्य पर्याय निवडला आहे. तिसरे अजितनिष्ठ मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी मात्र अजित पवार यांच्यावरील निष्ठा राखली आहे. त्यामुळे या पक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली आहे. मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील- अनगरकर यांचे भक्कम पाठबळ हेच आमदार यशवंत माने यांचे प्रमुख भांडवल मानले जाते.

हेही वाचा >>>मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं नेमकं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे ही जागा समजली जाते. त्यामुळे या पक्षात इच्छुकांची संख्या २६ वर पोहोचली आहे. यात भाजपमधून शरद पवार गटात घर वापसी करण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजित व कन्या कोमल साळुंखे-ढोबळे यांच्यासह पूर्वाश्रमीचे भाजपचे संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम, सोलापूरच्या माजी महापौर प्रा. सुशीला आबुटे आदींचा त्यात समावेश आहे. यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.