महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी एक मुलाखत पार पडली. लोकमान्य सेवा संघ पार्लेच्या शतकपूर्ती निमित्त त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीतून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकार आणि राजकीय नेता म्हणून जडणघडण कशी झाली? याबाबत आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, त्यांनी विविध हलक्या-फुलक्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
यावेळी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं राज ठाकरेंना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दलही विचारलं असता राज ठाकरेंनी थेट उत्तर दिलं आहे. तसेच संबंधित अभिनेत्री का आवडते याचं कारणही त्यांनी सांगितलं.
तरुण वयात तुम्हाला एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता आवडत होता का? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “मला पूर्वीपासून आतापर्यंत आवडलेली एकच अभिनेत्री आहे, ती म्हणजे हेमा मालिनी… हेमा मालिनीच्या चेहऱ्यामध्ये जेवढं उत्तम पावित्र्य आहे. तेवढं पावित्र्य मी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीच्या चेहऱ्यामध्ये पाहिलं नाही. कदाचित हेमा मालिनीच्या आगमनानंतरच आपल्याकडील कॅलेंडर्स बदलली असतील.”
हेही वाचा- आज शिंदे गट-मनसे युतीची घोषणा होणार? एकनाथ शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट देताच चर्चांना उधाण
हेमा मालिनीकडे पाहून तुमच्यातील व्यंगचित्रकार जागा होतो का? असं विचारलं असता राज ठाकरे पुढे म्हणाले, “नाही, त्या बाईमध्ये काहीही व्यंग नाही. व्यंगचित्र काढण्यासारखं त्यांच्यात काहीही नाही.”
हेही वाचा- “मी अपघाताने राजकारणात आलो”, सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य
दरम्यान, राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केलं. “आताचं महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर मी या राजकारणात योग्य नाही, असं मला वाटतं. महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ आहे. आतापर्यंत मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही. याला सोशल मीडिया कारणीभूत आहे, असं मला वाटतं. कारण कुणीही व्यक्त व्हायला लागलंय. त्यांच्या व्यक्त होण्याला पैसे लावले पाहिजे, तरच ते गप्प होतील. कुणी काहीही बोलतंय. हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय. मी यावर अनेकदा बोललो आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
“मला आता या सगळ्या गोष्टींचा वीट यायला लागला आहे. येथे अनेक लोकांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं आहे, पण असा महाराष्ट्र कधी कुणी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे,” असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.