‘कोण कुठला राजू शेट्टी? स्वत:च्या समाजाचे कारखाने चालू ठेवून इतरांचे बंद पाडायचे हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. तुझं दुकान बंद कर ना, मग इतरांकडं जा. स्वत:चं दुकान चालू ठेवून इतरांची बंद करणं हे बरं नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर शेट्टी फक्त स्वत:च्या समाजाचे हित पाहात असल्याचे सूचक विधान करून ऊसविरोधी आंदोलनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात उसाच्या दरावरून आंदोलन पेटले आहे. विशेषत: शेट्टी यांची संघटना आक्रमक बनली आहे. त्यांनी राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील कर्मयोगी कारखान्यासमोर आठवडय़ापासून आंदोलन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर पवारांनी पहिल्यांदाच शेट्टी यांना थेट लक्ष्य केले. बारामती तालुक्यातील सांगवी गावातील ग्राम सचिवालयाचे उद्घाटन करताना त्यांनी ग्रामस्थांना संबोधित केले.
पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांमध्येच समन्वय नाही. त्यांच्यापायी आपलेच कारखाने बंद पाडून नुकसान परवडणारे आहे का? राजू शेट्टी कोण कुठला त्याचा शोध घ्या. मला समाजाबद्दल बोलायचे नाही, पण त्याच्या मतदारसंघातले वारणासारखे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ते कोणत्या समाजाचे आणि शेट्टी कोणत्या समाजाचे ते पाहा. त्यावरून कळेल. शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर स्वत:च्या घराभोवतीचे कारखाना बंद करा, मग दुसऱ्यांकडे जा. स्वत:चं दुकान चालू ठेवा दुसऱ्यांकडं जायचं कशासाठी? चांगला दर देणाऱ्या कारखान्यांच्या दारात आंदोलन करण्यापेक्षा कमी दर देणाऱ्यांसमोर करा.’ शेट्टी यांच्याबाबत हे विधान करून पवारांनी आंदोलक शेतकऱ्यांना सूचक संदेश दिला असल्याचे मानले जात आहे.    
कारखाने व आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
ऊसभावाच्या प्रश्नावरून साखर कारखाने किंवा शेतकरी संघटनांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीरामपूर येथे दिला. तसेच उसाच्या भावाबद्दल कारखान्यांनी सहमतीची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा