दुष्‍काळाची खरंच काळजी वाटत असेल तर महाराष्‍ट्रात आयपीएलचे सामने का घेता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज  जालना येथील जाहीर सभेत केला. राज्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडल्याचे सध्या चित्र असताना नागरिकांनी नक्की कुणाकडे गा-हाणे गायचे, तसेच हा दुष्काळ निसर्गामुळे पडला आहे कि सरकारमुळे असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. 
मनसे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उफाळलेल्या संघर्षांवर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. परंतू राज यांनी झालेल्या घटनेबाबत अधिक न बोलता पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षावर चहुबाजूंनी हल्ला चढवला.   
गेली चौदा वर्षे महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या चौदा वर्षात सत्ताधा-यांनी महाराष्‍ट्राला काय दिले असा सवालही त्यांनी विचारला.  
राज ठाकरे पुढे म्हणाले कि, महाराष्‍ट्रात तब्बल तीन दशके अनेक प्रकल्‍प रखडले आहेत. अनेक ठिकाणी प्रत्‍यक्ष कामाला देखिल सुरुवात झालेली नाही. हजारो कोटी रूपये यामध्ये वाया गेले, प्रकल्‍पांच्‍या‍ किंमती अनेक पटींनी वाढल्‍या, याची उत्तरं शरद पवारांनी दिली पाहिजेत एसं राज ठाकरे म्हणाले.  
नेहमीप्रमाणे राज ठाकरेंनी आजच्या सभेतही गुजरातचे गुणगान गायले. गुजरातमध्ये झालेली प्रगती महाराष्ट्रात का होत नाही, असं ते म्हणाले.  
महाराष्ट्राबरोबर जे असभ्य वर्तन करतात त्यांच्या बद्दल सभ्यपणे का बोलावे असा सवालही राज ठाकरे यांनी केला. नाशिक महापालिकेमध्ये मनसेची सत्ता असताना त्याबाबतचे प्रश्न पाच वर्षांनंतर विचारा, असं ते म्हणाले. तसेच मुंबईमध्ये निघालेल्या मोर्च्यामध्ये जेव्हा महिला पोलिसांवर हात टाकला गेला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते कुठे गेले होते, असंही ते म्हणाले.  
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना पुण्‍यात येण्याचे आव्हान दिले आहे, त्यावर मी सात तारखेला पुण्‍यात येणार आहे हिम्‍मत असेल तर मला रोखून दाखवा, असे सांगत तोपर्यंत राजकीय वातावरण तापलेले राहील याची पुरेपुर काळजी घेतली.

Story img Loader