Who is Rutuja Patil : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं म्हणजेच जय अजित पवार यांचं लग्न लवकरच होणार आहे. अजित पवारांचा मुलगा जय आणि त्याची होणारी पत्नी ऋतुजा पाटील ( Rutuja Patil ) या दोघांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. जय पवार यांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो पोस्ट केले होते. आपण जाणून घेऊ कोण आहेत ऋतुजा पाटील?
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले फोटो
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने, या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी १३ मार्चला शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत. तसंच या लग्न सोहळ्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? या चर्चाही सुरु झाल्या आहेत. ऋतुजा पाटील ( Rutuja Patil ) आणि जय पवार यांची काही वर्षांपासूनची ओळख आहे असंही समजतं आहे. या दोघांनी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांची १३ मार्चला भेट घेतली. पवार कुटुंबातल्या महिलांनी या दोघांनी औक्षण केल्याचे फोटो सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले आहेत.
अजित पवारांची होणार सून ऋतुजा पाटील कोण आहेत?
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटीलशी होणार आहे. त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. मागच्या काही वर्षांपासून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांची सून आहेत.
जय पवार विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेत
महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जय पवार चर्चेत आले होते. अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार यांनी सांभाळली होती. गावोगावी दौरे करुन त्यांनी अजित पवार यांचा प्रचार केला होता. जय पवार हे काही काळ दुबईत होते. त्यानंतर ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० किंवा ११ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती आहे.
© IE Online Media Services (P) Ltd