लोकसभेला आम्ही २३ जागा लढलो होतो. त्यातील १८ जागांवर विजय मिळवला होता. संभाजीनगर मध्ये थोडक्या मतांनी पराभव झाला. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रात जागाच जिंकल्या नाही. पण, काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार. यावरती दिल्लीतील हायकमांड आणि आमचं एकमत झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी वक्तव्य करत असेल, तर त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“ठाकरे गटानं २३ जागा लढवल्या तर आम्ही कुठं लढणार?”, असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला होता. याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “संजय निरुपम कोण आहेत? संजय निरूपमांना अधिकार आहेत का? काँग्रेसचं हायकमांड दिल्ली आहेत. आम्ही दिल्लीत चर्चा करू.”
“गल्लीतील लोक राष्ट्रीय स्तरावरील चर्चा करत असतील, तर कोण ऐकणार?”
“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्याशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आम्ही किती जागा लढविणार, याची चर्चा दिल्लीत होईल. गाव आणि गल्लीतील लोक राष्ट्रीय स्तरावरील चर्चा करत असतील, तर कोण ऐकणार?” अशी खोचक टिप्पणी संजय राऊतांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांबाबत केली आहे.
“काँग्रेसला शून्यातून सुरूवात करायची आहे”
“आम्ही आणि राष्ट्रवादीनं जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, असं बैठकीत ठरलं आहे. काँग्रेसनं एकही जागा जिंकली नाही. काँग्रेसला शून्यातून सुरूवात करायची आहे. तरीही काँग्रेस महाविकास आघाडीत आमचा मित्रपक्ष आहे. आम्ही एकत्र काम करू,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
“राम वनवासात जातील, असं कृत्य करू नका”
“आम्ही राम मंदिराचे निमंत्रण मिळण्याची वाट पाहत बसलो नाही. हा १५ ऑगस्टची परेड किंवा २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही. हा भाजपाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक जाणार नाहीत. हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातले असते. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत. अशा प्रकारचे राजकारण करून प्रभू श्री राम यांना त्रास होईल आणि त्यांच्या आत्म्याला त्रास होऊन परत ते वनवासात जातील, असं कृत्य करू नका,” असेही संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं आहे.