राज्यभरात मागील काही दिवसांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात, आर्यन खान सोबत चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून क्रुझ ड्रग्ज केससह सहा प्रकरणाचा तपास आज काढून घेण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणांचा तपास आता एनसीबीचे एक केंद्रीय पथक करणार आहे, ज्याचे नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह करणार आहेत. संजय सिंह कोण आहेत हे जाणून घेऊया…
एनसीबी अधिकारी संजय सिंह यांनी यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून काम केले आहे. संजय कुमार सिंह १९९६ च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहे. ते सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे उपमहासंचालक आहेत. त्यांनी ओडिशा आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचेही नेतृत्व केले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर विशिष्ट पद्धतीने करत असल्याची देखील टीका नवाब मलिक यांनी केली होती. त्यानंतर आता एनसीबीनं मोठा निर्णय घेतला आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय होता.
तर, समीर वानखेडे यांनी एएनआयला सांगितले की, “मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे.”