ISIS ही जगातली सर्वात क्रूर समजली जाणारी दहशतवादी संघटना आहे. आससिसने २०१५ मध्ये सीरियावर कब्जा केला होता. त्यावेळी जगभरातल्या अनेक देशांमधले लोक हे या संघटनेत सहभागी होण्यासाठी सीरियाला पळाले होते. अशात आता जिहादी ब्राईड हे नाव चर्चेत येतं आहे. याचं कारण आहे बीबीसीची आणखी एक वादात अडकलेली डॉक्युमेंट्री जिचं नाव आहे द शमीमा बेगम स्टोरी. या डॉक्युमेंट्रीला युकेमधून कडाडून विरोध होतो आहे. शमीमा बेगम हे नाव चर्चेत आहे. ती आहे कोण आपण जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ISIS मध्ये १५ वर्षांची असतानाच सहभागी झाली शमीमा

आयसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेत जाण्यासाठी वयाच्या १५ व्या वर्षी शमीमा बेगम सीरियात आली. तिला ISIS BRIDE असं म्हटलं जातं. २०१९ मध्ये ISIS चा खात्मा झाला. तेव्हापासून शमीमा बेगम आणि तिच्यासारख्या शेकडो मुली सीरियातल्या डिटेंशन सेंटर किंवा तुरुंगांमध्ये जेरबंद आहेत. ब्रिटनने या सगळ्या मुलींची नागरिकता काढून घेतली आहे. ब्रिटनमध्ये आपल्या पुन्हा नागरिकत्व मिळावं म्हणून या मुली ब्रिटन सरकारविरोधात कोर्टातही गेल्या आहेत.

शमीमाने मीडियाला दिला दोष

शमीमा बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आली आहे. तिने सीरियामध्ये का गेली ते सांगितलं ती म्हणते की ब्रिटनचे लोक माझ्याविषयी मनात आकस आणि गैरसमज बाळगून आहेत. मी चुकीचं काहीही वागलेली नाही, लोक मला जसं समजतात तशी मी नाही. या सगळ्यांच्या मनात जो राग तो राग आयसिस विषयीचा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ISIS हे नाव येतं लोक माझ्याविषयी विचार करू लागतात. यासाठी प्रसारमाध्यमं जबाबदार आहेत. त्यांनी माझी प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली. त्यामुळेच लोक माझा तिरस्कार करतात असं शमीमाने सांगितलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे शमीमा बेगमने?

शमीमा बेगमने हे देखील म्हटलं आहे की जेव्हा मी सीरियात आली होते तेव्हा मला अनेक लोकांनी इंटरनेटवर सल्ले दिले. सीरियात जाऊन काय करणार? काय करायचं याविषयी मला लोक सांगत होते. मी सीरियाला आले ही माझी चूक झाल्याचं मला कळलं आहे आता मला ब्रिटनला परतायचं आहे. मात्र ब्रिटनने माझी नागरिकता काढून घेतली आहे. १५ व्या वर्षी जेव्हा मी ब्रिटन सोडलं तेव्हा माझी काही मित्र-मैत्रिणींनी दिशाभूल केली होती. मी त्यावेळी सारासार विचार न करता या ठिकाणी आले. आता या गोष्टीला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता मला ब्रिटनमध्ये जायचं आहे असंही शमीमाने सांगितलं. स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शमीमाने हे वक्तव्य केलं आहे.

कोण आहे शमीमा बेगम?

शमीमा बेगम बांगलादेशी वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. २०१५ मध्ये ती दोन मुलींसह ISIS या दहशतवादी संघटनेत येण्यासाठी ब्रिटनमधून पळून आली. तिच्यासोबत आलेल्या दोन मुलींचा शोध लागू शकलेला नाही. शमीमा बेगम २०१९ ला सीरियातल्या एका रेफ्युजी कँपमध्ये सापडली होती. त्यावेळी ती नऊ महिन्यांची गरोदर होती. तिला मूलही झालं पण त्या मुलाचा निमोनियामुळे मृत्यू झाला. फिदायीन हल्लेखोरांसाठी जॅकेट बनवण्यात शमीमा तरबेज असल्याचा आरोप तिच्यावर आहे. मात्र शमीमाने तिच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत.

द शमीमा बेगम स्टोरी या डॉक्युमेंट्रीला विरोध का होतोय?

‘द शमीमा बेगम स्टोरी’ ही ९० मिनिटांची डॉक्युमेंट्री बीबीसीने प्रदर्शित केली आहे. द डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार “आय एम नॉट ए मॉनस्टर” या पॉडकास्टचे १० एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. इंग्लंड ते सीरिया पर्यंतचा शमीमाचा प्रवास कसा होता? यावर ही डॉक्युमेंट्री आधारीत असून त्यातून बाहेर पडण्याच्या तिच्या संघर्षाबाबत माहिती देण्यात आली आहे. सीरियामध्ये जाण्याच्या निर्णयाचे शमीमाला दुःख वाटत असून त्याचा तिला पश्चाताप होत आहे, असी थीम या डॉक्युमेंट्रीमध्ये असल्यामुळे युकेमधील नागरिक नाराज आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is shamima begum dubbed the isis bride and made famous by a bbc documentary scj