राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीच्या (१२ जानेवारी) पूर्वसंध्येला बोरिवली येथील मागाठाणे येथे राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशीष शेलारांनी मुंबई हृदयसम्राट कोण असा प्रश्न उपस्थितांना विचारला. त्यावेळी उपस्थितांकडून भाजपाच्या नेत्याचं नाव समोर आलं आहे.
आशिष शेलार म्हणाले, मुंबईच्या विकासाच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहिली तर खऱ्या अर्थाने मुंबई हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत.
हेही वाचा >> एकनाथ शिंदेंच्या ‘हिंदुहृदयसम्राट’ प्रचारफलकावरून वाद
“हे मी भाषणासाठी म्हणत नाही तर मुंबईतील वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी ९ मेट्रो रुळ कोणी केले? मुंबईचा कोस्टल रोड कोणी केला? मुंबईच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची कोणी वाढवली? मुंबईच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट कोणी दिली? पाणी टॅक्समध्ये सूट कोणी दिली? एसआरएमध्ये अडकलेल्या लोकांना दिलासा कोणी दिला?”, असे अनेक प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थितांना विचारले. त्यावेळी सर्वांनी देवेंद्र फडणवीस असा नामघोष केला. तसंच, म्हणून देवेंद्र फडणवीस मुंबई हृदय सम्राट आहेत, असंही आशिष शेलार म्हणाले.
हिंदूहृदय सम्राटवरून झाला होता वाद
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारफलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करण्यात आला होता. यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. या उल्लेखावरून आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी टीकेची झोड उठविली. हवामहल मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी शिंदे गेले होते. त्यांच्या फलकावर शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करण्यात आला होता. त्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला होता.