देशभरात भाजपाविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. विरोधकांची मोट बांधण्याकरता नितेश कुमारांसह सर्वचजण प्रयत्न करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आगामी काळात विविध ठिकाणी निवडणुकाही प्रस्तावित आहेत. यावरून ठाकरे गटाने भाजपावर आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

“२०२४ च्या गणिताची आतापासून जुळवाजुळव सुरू झाली आहे. ही जुळवाजुळव फक्त भारतीय जनता पक्षच करतोय असे नाही, तर यावेळी भाजपेतर पक्षही कामास लागले आहेत. भाजपच्या पायाखालची सतरंजी खेचली जात आहे. कर्नाटकच्या निकालामुळे मोदी-शहांच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला आहे. दक्षिणेतला एकमेव दरवाजा त्यांच्यासाठी बंद झाला आहे. नव्या संसदेत तामीळनाडूतून खास ‘सन्गोल’ आणला तरी तामिळी जनता ‘हा किंवा तो द्रमुक’ सोडून भलत्या-सलत्यांच्या पाठीमागे पळत नाही हा आतापर्यंतचा इतिहास. त्यामुळे दक्षिणेत भारतीय जनता पक्षाने कर्नाटक हे एकमेव राज्य गमावले हा २०२४ च्या तोंडावर अपशकुन आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून हे वार करण्यात आले आहेत.

मोदी-शहा या दुकलीविरोधात देशभरात संताप आहे

“पुढील काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह चारेक राज्यांत निवडणुका होतील. यातील मध्य प्रदेश भाजपकडे राहणार नाही. महाराष्ट्राप्रमाणे एका शिंद्यांस काँग्रेसमधून पह्डून भाजपने मध्य प्रदेशात सरकार बनवले. ते कमालीचे अलोकप्रिय ठरले व भाजप त्यामुळे गाळात जात आहे. छत्तीसगढ पुन्हा काँग्रेसकडेच जाईल. राजस्थानात जादूगार अशोक गेहलोत भाजपास सहजासहजी पुढे जाऊ देणार नाहीत. हे चित्र जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचे द्योतक आहे. मोदी-शहा या दुकलीविरोधात देशभरात संताप आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये सोडली तर मोदी-शहांच्या विरोधात संपूर्ण देश उभा ठाकला आहे. राज्यातील प्रादेशिक पक्षांना व त्यांच्या छत्रसालांना एकत्र बांधण्यासाठी प्रत्येक जण शर्थ करीत आहे”, असं टीकास्त्रही सोडण्यात आलं आहे.

मोदी हे ब्रह्मांडासही ज्ञानामृत पाजतात

“गुजरातने शंभर टक्के लोकसभेच्या जागा भाजपास दिल्या तरी काही खरे नाही, पण विधानसभेप्रमाणे ‘आप’ने गुजरातेत चढाओढ केली नाही तर भाजपास पैकीच्या पैकी जागा मिळणार नाहीत. उत्तर प्रदेशात मायावतींचा मासा भाजपच्या गळास लागला आहे, पण राहुल गांधी यांनी एक स्वतंत्र मोहीम उत्तरेत राबवली तर चित्र बदलू शकेल. अखिलेश यादव-काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा समंजसपणा दाखवला तर ‘हिंदू-मुसलमान’ दंगलींचा फंडा योगी राज्यात चालणार नाही. भारत जोडो यात्रा, कर्नाटकाच्या विजयानंतर राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि पकड मजबूत झाली आहे. मोदी हे ब्रह्मांडासही ज्ञानामृत पाजतात. तसे राहुल गांधींचे नाही. त्यांच्यातील संयम लोकांना आवडू लागला आहे. मोदी-शहांचे मोगली क्रौर्य, अहंकार, उठवळ राजकारण, थापेबाजी दिवसेन्दिवस उघडी पडत आहे”, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

भाजप हा अजिंक्य नाही

“लोकांना पर्याय हवा आहे. भाजप हा अजिंक्य नाही. मोदींचा पराभव होऊच शकत नाही हा भ्रम तुटू लागला आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हे स्थान भाजपचे उरलेले नाही. देशात 36 राज्ये आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, गुजरात, हरयाणा, मणिपूर, अर्धेमुर्धे महाराष्ट्र ही राज्ये सोडली तर भाजपच्या नावे सगळा ठणठण गोपाळ आहे. बिहार, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तामीळनाडू, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड अशा राज्यांत भाजप किंवा मोदी नाहीत. 2014 व 2019च्या विजयात तांत्रिक हेराफेरी होती हा लोकांचा संशय होता, पण ‘ईव्हीएम’चा गैरवापर व पैशांचा वापर करून मोदींना विजयी केले जाते ही दंतकथा 2024 ला तुटेल”, असंही यात म्हटलं आहे.

पंतप्रधानांचा चेहरा कोण?

“लोकांचा रेटा मोठा आहे. मोदी-शहा प्रवृत्तीचा पराभव घडविण्यासाठी जनतेने मन बनवले आहे. देशभक्त पक्षांनी कपाळकरंटेपणा करू नये. मोदी नाही तर कोण? राहुल गांधी मोदींसमोर टिकणार नाहीत. मोदी यांना राहुलमुळे विजय मिळतो वगैरे भ्रामकांतून सगळ्यांनी बाहेर पडायला हवे. मोदींना आव्हान आता राहुल गांधींचेच वाटत आहे हे मोदी-शहांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. मोदी हेच भाजपच्या दारुण पराभवाचे कारण ठरतेय. अमित शहा त्या पराभवास हातभार लावतील. आता प्रश्न राहतो मोदी विरोधकांचा. पंतप्रधानांचा चेहरा कोण? संविधान, भारतमाता हाच चेहरा आहे”, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

Story img Loader