Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गायिका म्हणून देखील ओळखलं जातं. अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांची गाणी सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर तुफान व्हायरल होतात. तसेच अमृता फडणवीस यांची गाणी नेहमीच चर्चेचा विषय ठरल्याचं याआधीही अनेकदा पाहायला मिळालं. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आवडता गायक आणि गायिका कोण? यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारले आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत दिली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील राजकारण आणि देशातील राजकारणासह विविध विषयांवर प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी देखील खास शौलीत उत्तरे दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमचा आवडता गायक आणि गायिका कोण? असा प्रश्न विचारला. यावेळी अमृता फडणवीस या देखील व्यासपीठाच्या समोर बसलेल्या होत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची उत्तर देताना चांगलीच गोची झाली. प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही मला बायकोसमोर असे प्रश्न विचारता? मी एक सांगू शकतो की माझा आवडता गायक कोण? तर किशोर कुमार आणि आवडती गायिका…, तितक्यात जयंत पाटील म्हणाले की नका सांगू. यावर पुन्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “मी माझ्या बायकोचेही नाव घेऊ नको का?”, असं म्हणताच एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
मंत्रिमंडळातील तीन लाडके मंत्री कोण?
मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्री सोडून तीन लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे. त्या योजनेच्या निकषात जे-जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेन”, असं त्यांनी म्हटलं.
‘केंद्रात शरद पवारांसारखे नेते प्रमुख विरोधी असते तर…’
“आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे. सध्या भारताच्या राजकारणात एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोक एकप्रकारे निर्णायक मतदान करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता एक गोष्ट महत्वाची आहे की लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणं महत्वाचं आहे. लोकशाही जर आणखी प्रगल्भ करायची असेल तर सत्तारुढ पक्षाबरोबर विरोधी पक्ष देखील प्रगल्भ असला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“आता सांगायचं झालं तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुमच्या सारखे लोक किंवा शरद पवार यांच्यासारखे लोक जर केंद्रात प्रमुख विरोधी असते तर कदाचित प्रगल्भता दिसली असती. मात्र, आज दुर्देवाने केंद्रात विरोधी पक्षात ती प्रगल्भता दिसत नाही. विरोध करताना आपण अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे. ज्या शक्ती अदृश्य काम करतात, अशा शक्तींची मदत आपण घेत आहोत का? या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या कोणती आवश्यकता असेल तर प्रगल्भ विरोधी पक्षाची आहे”, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.