आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील कोणी शेतात गेल्यामुळे वाचले तर, कोणी कामानिमित्त गावाबाहेर गेल्यामुळे बचावले. मात्र, दुर्दैवी योग असा की, गावाबाहेर वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि शहरात नोकरीसाठी असणारे लोक १५-२० जण भातलागणीसाठी गावात आले अन् चिखल-दगडाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
माळीण गावातील सावळेराम लेंभे हे मुलीला माळीण फाटय़ावर सोडून पत्नीसह शेतात गेल्यामुळे बचावले होते. तर आणखी एक गावातील व्यक्ती कामाच्या निमित्ताने बाहेत गेल्याने बचावला होता. माळीण गावाच्या परिसरात सध्या भात पिकाची लागवड सुरू आहे. त्यामुळे पुणे परिसरात असणारे काहीजण भात लागवडीसाठी गावाकडे आले होते. मात्र, ही भात लागवडच त्यांच्या जीवावर बेतली. भोसरीतील टेल्को कंपनीत नितीन झांजरे हे नोकरीस आहेत. ते पत्नीला पुण्यातच ठेवून भात लागवडीसाठी सोमवारी गावाकडे आले होते. या दुर्घटनेत ते सुद्धा आई-वडिलांसह ढिगाऱ्याखाली गडप झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती पत्नीने टीव्हीवर पाहिल्यानंतर काय झाले म्हणून ती गुरुवारी सकाळी माळीण गावात पोहोचली. मात्र, या महिलेला तिचे माळीण गावातील घर दिसले नाही. तिचे पती आणि सासू-सासरे या ठिकाणी गाडले गेल्याचे समजले. हे पाहताच तिने हंबरडा फोडला. माळीण गावातील नदीच्या बाजूला असणाऱ्यांपैकी बचावलेले दत्ता धादवड यांनी सांगितले की, या गावातच त्यांच्या पत्नीचे मामा, काका राहतात. त्यांच्याकडे सध्या भात लागवड सुरू होती. त्यासाठी शेजारच्या गावातील काही व्यक्ती बोलाविण्यात आल्या होत्या. मंगळवारी त्यांनी दिवसभर शेतात भातलागवडीचे काम केले. सर्वजण या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
 माळीण गावात सातवी पर्यंतची शाळा असून पुढील शिक्षणासाठी काही विद्यार्थी घोडेगाव, मंचर येथील वसतिगृहात राहण्यास आहेत. २९ जुलै रोजी शाळेला सुट्टी असल्यामुळे घोडेगाव येथील वसतिगृहात असणारे बारा ते तेरा विद्यार्थी गावाकडे आले होते. सुट्टीचा दिवस घालविल्यानंतर त्या दिवशी माळीण परिसरात मोठा पाऊस झाला होता. बुधवारी सकाळी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले होते. पाणी पाहून हे सर्वजण आणि गावातील काही लहान मुले शाळेजवळच असलेल्या मंदिराजवळ असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
‘आम्ही एकत्र आलोच नाही..
‘दिवाळीनंतर आमचे कुटुंब पुन्हा एकत्र राहणार होते. पण आम्ही एकत्र आलोच नाही..’ माळीण गावातील दुर्घटनेत स्वत:च्या कुटुंबाबरोबरच जवळचे वीस नातेवाईक ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यांबद्दल सखाराम झांजरे सांगत होते. हे सांगत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. पीएमपीएल मध्ये वाहक म्हणून झांजरे काम करतात. बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झांजरेंना गावावर दरड कोसळल्याची बातमी कळली. त्या वेळी ते शिवाजीनगर येथून कोंढव्याला जात होते. त्यांनी बस शिवाजीनगर डेपोत लावून गावाकडे धाव घेतली. त्यांना पाहायला मिळाला तो सर्वनाशच. आई-वडील, पत्नी, मुलगी, दोन काका, काकी, त्यांच्या सुना, असे जवळचे २३ नातेवाईक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. झांजरे यांची माळीणमध्ये नऊ एकर शेती आहे. त्यांना मदत करण्यासाठी झांजरेंची पत्नीही नुकतीच गावी आली होती. दिवा़ळीनंतर ते सर्व कुटुंब पुण्यात एकत्र राहणार होते. पण या दुर्घटनेत त्या स्वप्नांचा चिखल झाला.  शोकाकूल झांजरे सांगत होते, मी आणि माझे दोन भाऊ पुण्यात होते. आम्ही तेवढे वाचलो.’’
तीन महिन्यांचा मुलगा, आई सुखरूप !
ढिगाऱ्यात अडकलेला तीन महिन्याचा रुद्र लिंबे आणि त्याची आई प्रमिला लिंबे यांना चिंचवाडीतील राजू लिंबे आणि दिलीप लिंबे या तरूणांनी बुधवारी ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले. प्रमिला लिंबे या रुद्रला औषध पाजत असताना अचानक आलेल्या लोंढय़ामुळे घरात अडकल्या. घरावर  मातीचा ढीग साठला. तरीही घरात हवा जाण्यासाठी थोडी जागा होती. राजू आणि दिलीप यांनी रुद्रच्या रडण्याचा आवाज ऐकला त्यांना ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढले. रूद्र आणि प्रमिला लिंबे यांच्यावरउपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा