मराठी बोलतो तो खरा मराठी तसेच समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे येतो तो खरा मराठी माणूस, अशी मराठी माणसाची व्याख्या प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी येथे मांडली. राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्यासाठी येथील भारतीय एकात्मता समितीच्या वतीने देण्यात येणारे ‘भारतीय एकात्मता समिती जीवन संजीवनी पुरस्कार’ रविवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात खेडेकर आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना खेडेकर यांनी आजचा हा कार्यक्रम आपल्यासाठी भावनिक असल्याचे सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाजात अनेक जण विविध प्रकारे समाजसेवेचे कार्य करीत असतात. बऱ्याच जणी ‘सिस्टर’ म्हणून कार्य करीत असताना आईचेही कार्य करतात. अशा व्यक्तींची आठवण ठेवून त्यांना समितीने गौरविले त्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रास्ताविक समितीचे कार्याध्यक्ष जे. पी. जाधव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर निवड समिती सदस्य शर्वरी लथ, डॉ. निवेदिता पवार, डॉ. संध्या पाटील याही उपस्थित होत्या. शशिकलाबाई गाडगीळ यांना ‘विशेष जीवन गौरव पुरस्कार’, तर दीपक दीक्षित, रजनी सोनवणे, विमल शिंदे, माहेतलम नईम पीरजादे, गिरीश मन्तोडे, विष्णू काळबांडे, करीम सौदागर, विमल भाबड, शिजी नायर, पुष्पा चांदवडकर, शांताबाई टिळेकर, ममता साळवे, शोभा कुसमोडे, चंद्राबाई भदाणे, राजू ससाणे, सुमन ठाकूर या १६ जणांना ‘भारतीय एकात्मता समिती जीवन संजीवनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मानपत्र व रोख रुपये ११ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध धर्माचे सभासद असलेली भारतीय एकात्मता समिती ही एक सेवाभावी स्वयंसेवी संस्था असून, तीन दशकांपासून नाशिक शहरामध्ये राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्यासाठी कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा