Udayanraje Bhosale on mahatma Phule: महात्मा जोतीराव फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील फुले वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा, सर्व धर्म समभावाचा विचार जोतीराव फुलेंनी जनसामान्यांत पोहोचवण्याचे काम फुलेंनी केले असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. फुलेंच्या कार्याचा गौरव करत असताना त्यांनी मुलींची शाळा काढण्याची प्रेरणा कुणाकडून घेतली याबद्दलही त्यांनी वाच्यता केली.

उदयनराजे भोसले नेमके काय म्हणाले?

महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना उदयनराजे भोसले म्हणाले की, महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती गोळा केली, ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरिता खर्च केली. महात्मा फुले यांनी एकप्रकारे थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कुणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या राजवाड्यात केली होती.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ज्या राजवाड्यात शाळा सुरू करण्यात आली होती. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. समाजासाठी झटलेल्या महापुरूषांच्या स्मारकाचे जतन करणे आपल्या सर्वांचे काम आहे. भावी पिढीला यातून प्रेरणा मिळावी. महापुरूषांच्या विचारांचे भावी पिढीने अनुकरण करावे, याकरिता महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करायला हवी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त (१२ एप्रिल) रायगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांकरिता खर्च केला. राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण आज दुःख याचे वाटते की, ज्या महापुरूषांनी निस्वार्थीपणे आयुष्य वेचले त्यांच्याबद्दल अनुद्गार काढले जात आहेत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.