सांगली : सांगलीचा खासदार कोण यावरून दुचाकीची पैज लावणे दोन तरुणांना अंगलट आले असून पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत.
सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली असली तरी खरी चुरस भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील व अपक्ष विशाल पाटील यांच्यातच दिसत आहे. मतदानानंतर समर्थक कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होणार यावर पैजा लावत आहेत. अशीच पैज दोन्ही उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही लावली. मात्र, ही पैज कोण जिंकणार अथवा कोण हरणार हे कळण्यापूर्वीच त्यांच्या अंगलट आली आहे.
हेही वाचा – नाशिक मतदारसंघात ओबीसींची मते महत्त्वाची
हेही वाचा – तेजस गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव (वय २९) आणि शिरढोण येथील गौस मुबारक मुलाणी या दोघांनी कोण जिंकणार यावर पैज लावली. निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट (एमएच १० डीएफ ११२६) व युनिकॉर्न दुचाकी (एमएच १० डीएंच ८८००) गाड्या परस्परांना देण्याची पैज लावली होती. पैज लावून तसा संदेश समाजमाध्यमावरून प्रसारित केला होता. पैजा लावल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना समजताच त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी दोघांवर कारवाई करत रमेश संभाजी जाधव (वय २९, रा. बोरगाव) आणि गौस मुबारक मुलाणी (वय ३८, रा. शिरढोण) यांना ताब्यात घेत दोघांच्या दोन लाख पंधरा हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच दोघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.