महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा सांगितलं आहे की, त्यांना चित्रपट दिग्दर्शक व्हायचं होतं. परंतु ते अपघाताने राजकारणात आले. बुधवारी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या या पॅशनबाबत बोलले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावेळी राज यांना प्रश्न विचारला की, तुम्ही फुल टाईम दिग्दर्शक झालात तर कोणत्या चित्रपटावर काम कराल? तसेच तुम्ही स्वतःचा बायोपिक कराल का?
अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, मी माझ्या बायोपिकबद्दल आधीच सांगितलंय. कारण मुळात बायोपिकसाठी त्या प्रकारचं व्यक्तिमत्व असावं लागतं. हल्ली कोणीही उठतं आणि बायोपिक करतं. इतर लोक तेच बायोपिक करतात ज्यांचं व्यक्तिमत्व त्यांना आवडलेलं असतं. माझ्या मते बायोपिक काढण्यासारखी जी व्यक्तिमत्तं देशात उरली असतील तर त्यात इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर ही एवढीच आहेत. यांच्यावर उत्तम बायोपिक होऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक काढण्याचं माझं काम सुरू आहे.
राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या बायोपिकचा विषय काढल्यावर मध्येच खासदार अमोल कोल्हे म्हणाले, मी जो प्रश्न विचारतोय त्याला स्वार्थाची किनार आहे, मला माहितीय समोर एक कॉम्पिटिशन बसली आहे. आपण एक शिवभक्त आहात आणि शिवाजी महाराजांवरील चित्रपट तुम्ही दिग्दर्शित करावा अशी तुमची इच्छा आहे. त्याचं काम कधी सुरू करणार आहात? कारण वय (माझं) होत चाललं आहे, म्हणून हा प्रश्न स्वार्थाची किनार असलेला आहे.
हे ही वाचा >> “देवेंद्र फडणवीस कधीच फिरायला नेत नाहीत”, अमृता फडणवीसांनी केली तक्रार, राज ठाकरे म्हणाले “तुमचे फोटो…”
यावर राज ठाकरे म्हणाले की, “चित्रपटाचं काम सुरू झालं आहे.लिखाणाचं काम सुरू आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये येईल. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक यावर काम करतील आणि मी तो चित्रपट दिग्दर्शित करत नाहीये.”