शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नावावरून छगन भुजबळ यांनी मोठा वाद निर्माण केला आहे. मनोहर कुलकर्णी असं नाव असलेला व्यक्ती संभाजी भिडे नाव धारण करतो, पण ब्राह्मण समाजात संभाजी नाव ठेवलंच जात नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे संभाजी भिडे नक्की कोण आहेत ते सांगावं? असा प्रश्न भुजबळांनी दोन दिवसांपूर्वीच विचारला होता. यावरून ब्राह्मण समाज विरुद्ध छगन भुजबळ असा वाद सुरू झाला आहे. यावर आजही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >> “ब्राह्मणांच्या मुलींना…”, संभाजी भिडेप्रकरणावरून छगन भुजबळांचे वक्तव्य; म्हणाले, “मी पुराणांवर…”
ब्राह्मण समाजाकडून धमकी
संभाजी भिडेप्रकरणात छगन भुजबळांनी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केल्याने परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी खुलं चॅलेंज दिलं आहे. छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्यांना १ लाख रुपयांच बक्षीस देणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. अशाप्रकारे अनेक धमक्या छगन भुजबळांना येत आहेत. यावरून त्यांनी कोणत्याही धमक्यांना घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुलेंसह ब्राह्मण समाजातील लोकांनीही सुधारणा केली होती. यामुळे कोणाला राग येण्याचं कारण नाही. बाकीच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. ब्राह्मण आहेत म्हणतात आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. यांना ब्राह्मण कोण म्हणणार? ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या आहेत, त्यांना ब्राह्मण म्हणायचं? मी चुकलो असेन तर माझ्याविरोधात कारवाई करावी” असंही छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा >> “कानाखाली मारणाऱ्याला १ लाख बक्षीस”, परशुराम सेवा संघाच्या घोषणेनंतर भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“सरस्वतीची पूजा करू नका असं मी म्हणालो नाही. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे देव आहेत. शाळेत महाविद्यालयात हे आपले देव आहेत, त्यांची पूजा करा, असं मी म्हणालो. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे”, असं भुजबळ म्हणाले.