पंढरपूर : कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. यंदा प्रथमच दोन उपमुख्यमंत्री असल्याने ही पूजा कोणाच्या हस्ते करायची, यासाठी मंदिर समितीने शासनाचा सल्ला मागितला आहे.
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली जाते. १९९५ मध्ये पहिल्या युती सरकारच्या काळात सुरू झालेली ही प्रथा आजवर कायम आहे. मात्र इतिहासात प्रथमच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने कुणाला आमंत्रण द्यायचे, याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला मागण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उत्तर आल्यानंतर महापूजेचे निमंत्रण दिले जाईल, असे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट केले.